मोठ्या प्रमाणावर कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव झालेल्या इराणमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील ४४ जण अडकले असल्याची माहिती खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली आहे. या लोकांच्या सुटकेसाठी त्यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना एक पत्रही लिहिले आहे.
याबाबत माहिती देताना पाटील म्हणाले, “सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरातील ४४ लोक इराणची राजधानी तेहरीन येथे अडकून पडले आहेत. याबाबत कोल्हापूरचे रहिवासी असलेल्या मोमीन यांनी माझ्याशी संपर्क साधला असून मदतीची मागणी केली आहे. गेल्या २२ फेब्रुवारीपासून ते तिथे आहेत.’

महाराष्ट्रातील या लोकांच्या सुटकेसाठी आपण पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. यावर पंतप्रधान कार्यालयाने माझ्या पत्राला उत्तर देताना सांगितले की, या लोकांना भारतात परत आणायचे आहे. मात्र, त्यापूर्वी तेहरीनमध्येच इराण सरकार एक प्रयोगशाळा उभारून तिथे त्यांची तपासणी करणार आहे, त्यानंतर खास विमानाने त्यांना भारतात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहितीही पाटील यांनी दिली. ते एबीपी माझाशी बोलत होते.

दरम्यान, “मोमीन यांच्याशी माझं रोज बोलणं होत आहे. त्यांच्यासह संपूर्ण गटाला मी कोणत्याही मदतीसाठी तेहरीनमधील भारतीय दुतावासाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे. हा गट पुन्हा सुखरुप भारतात परतेल अशी आशा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आश्विनी पाटील या साताऱ्यातील मुलीशी संपर्क साधून तिला सुखरुप परत भारतात आणण्यात आलं आहे,” असंही पाटील यांनी सांगितलं.