येमेनच्या दक्षिणेकडे असलेल्या अडेन शहरात सोमवारी करण्यात आलेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात किमान ४५ जण ठार झाले आहेत. लष्करात भरती होण्यासाठी आलेल्या इच्छुकांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला असल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.

लष्कर भरती केंद्राबाहेर एका आत्मघातकी हल्लेखोराने कारबॉम्बचा स्फोट घडविला त्यामध्ये २० जण ठार झाले. तर दुसऱ्या हल्लेखोराने लष्करात भरती होण्यासाठी आलेल्या इच्छुकांच्या समूहात शिरून आपल्याजवळील स्फोटकांचा स्फोट घडविला त्यामध्ये २५ जण ठार झाले. हे २५ जण लष्करातील कमांडरच्या निवासाबाहेर प्रतीक्षा करीत होते. या दोन आत्मघातकी हल्ल्यांमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून शिया बंडखोरांनी साना या राजधानीवर कब्जा केला असून त्यांच्याविरुद्ध सरकारने मोहीम हाती घेतली आहे. येथे अल-कायदा आणि आयसिसशी संबंधित गट सक्रिय आहेत. रविवारी करण्यात आलेल्या या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. साना शहरावर गेल्या काही महिन्यांत आत्मघातकी हल्ले करण्यात आले असून, त्यामध्ये प्रामुख्याने लष्कर आणि सुरक्षारक्षकांना लक्ष्य करण्यात आले आहे.