दिल्लीत १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला आहे. पिस्तूल आणि मॅगझिनची तस्करी करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली असून दिल्ली आणि नोएडातील गुंडांना ही महिला पिस्तूल पुरवत होती.

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने गेल्या काही दिवसांपासून शस्त्रास्त्रांच्या खरेदी-विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवली आहे. १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी गस्तही वाढवली आहे. दिल्लीत एक महिला पिस्तूल, काडतुसे, मॅगझिनची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार रविवारी सकाळी पोलिसांनी शास्त्रीपार्क परिसरातून महिलेला अटक केली. मोबई असे या महिलेचे नाव असून तिच्याकडून १४ पिस्तूल आणि १४ मॅगझिन जप्त केले आहे. मोबई ही मूळची मध्य प्रदेशची असून तिथून तडीपार केल्यानंतर ती दिल्लीत सक्रीय झाली. गेल्या १५ वर्षांपासून शस्त्रास्त्रांच्या विक्रीचे काम ती करते. दिल्ली आणि परिसराती गुंडांना मोबई शस्त्रास्त्र पुरवत होती. २०१४ मध्ये तिला फरार घोषित करण्यात आले होते. मोबई पोलिसांना चकवा देण्यासाठी ट्रेनमधून प्रवास करताना एक स्थानका अगोदरच उतरायची. शेवटी रविवारी पोलिसांनी तिला अटक केली आहे.

४५ वर्षीय मोबईला आत्तापर्यंत तीन वेळा बेकायदेशीररित्या शस्त्रांची विक्री केल्याप्रकरणी अटक झाली आहे. तुरुंगातून सुटल्यावर ती सक्रीय व्हायची. गुन्हेगारी क्षेत्रात तिला ‘कॉम्प्यूटर’ या नावाने ओळखले जाते.