ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती; मदतकार्य सुरू

हिमाचल प्रदेशमधील मंडी-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भूस्खलनात दोन बसमधून प्रवास करणाऱ्या ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अद्याप किती अडकले आहेत त्याची निश्चित आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या प्रवाशांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

शनिवारी रात्री उशिरा झालेल्या या दुर्घटनेमध्ये ५० जणांचा मृत्यू होण्याची शक्यता असल्याची भीती हिमाचल प्रदेशचे वाहतूक मंत्री जीएस बाली यांनी व्यक्त केली आहे.

एक बस चंबावरून मनालीला जात होती. तर दुसरी बस मनालीवरून कटरासाठी जात होती. या दुर्घटनेवेळी दोन्ही बस एका ठिकाणी अल्पोपाहार करण्यासाठी थांबविण्यात आल्या होत्या. या वेळी ढग फुटण्यासारखा आवाज येत या बसवर मातीचा मोठा ढिगारा कोसळला. यामुळे बस ८०० मीटर खाली घसरत जात या ढिगाऱ्याखाली पूर्ण दबली गेली. या बसमध्ये सुमारे ३० ते ४० प्रवाशी होते. ही घटना कळताच तात्काळ मदतकार्य हाती घेण्यात आल्याची माहिती आपत्ती विभागाचे विशेष सचिव डी डी शर्मा यांनी दिली.

लष्कर आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, बचावकार्य हाती घेण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

उत्तराखंडमध्ये मुलीचा मृत्यू

पिथौरागड : उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात मदरामा गावातील घर गाडले गेले असून यात सुनीता या १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर तिचे वडील शेर सिंह आणि आई राधा देवी दोघे बेपत्ता आहेत. या भागात बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.