हक्कांविषयी जनजागृतीचा परिणाम

नवी दिल्ली : चालू २०२१ या वर्षांत पहिल्या आठ महिन्यांत महिलाविरोधी गुन्ह्य़ांच्या तक्रारींत गेल्या वर्षीच्या याच काळातील तुलनेत  ४६ टक्के वाढ झाली आहे. यातील निम्म्या तक्रारी या उत्तर प्रदेशातील असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटले आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी येथे सांगितले की, महिला आयोगाने तक्रारी करण्याबाबत सातत्याने जनजागृती केल्यामुळे तक्रारींची संख्या वाढली आहे. महिला आता त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराबाबत अधिक जागरूक झाल्या आहेत.

राष्ट्रीय महिला आयोगाकडे जानेवारी ते ऑगस्ट या काळात यावर्षी १९९५३ तक्रारी आल्या होत्या तर २०२० मध्ये या तक्रारींची संख्या १३६१८ होती. जुलैत ३२४८ तक्रारी आल्या असून जून २०१५ पासूनचा हा उच्चांक आहे. १९९५३ तक्रारींपैकी ७०३६ तक्रारी या सन्मानाने आयुष्य जगण्याच्या कलमाखाली होत्या तर ४२९८ तक्रारी या घरेलू हिंसाचाराबाबत होत्या.  २९२३ तक्रारी या विवाहित महिलांच्या हुंडय़ासाठी छळाच्या होत्या. सन्मानाने आयुष्य जगण्याच्या कलमात मानसिक छळवणुकीचा समावेश आहे.

विनयभंगाच्या १११६ तक्रारी आल्या असून १०२२ तक्रारी या बलात्काराच्या आहेत. ५८५ तक्रारी या सायबर गुन्ह्य़ांच्या आहेत.

उत्तर प्रदेशातून १००८४, दिल्लीतून २१४७, हरयाणातून ९९५, महाराष्ट्रातून ९७४ तक्रारी आल्या होत्या.

महिलांमध्ये  त्यांच्या विरोधातील छळवणुकीच्या तक्रारी देण्याबाबत जागरूकता निर्माण केल्याने ही संख्या वाढल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सांगितले.

आकांक्षा फाउंडेशनच्या आकांक्षा श्रीवास्तव यांनी म्हटले आहे की, सायबर गुन्ह्य़ांचे ज्ञान, महिलांच्या शिक्षणात वाढ यामुळेही तक्रारी करण्यात वाढ झाली आहे. या तक्रारी वाढत आहेत हे चांगले लक्षण आहे कारण महिलांचे अत्याचार व अन्य गोष्टींबाबत बोलण्याचे धैर्य वाढत आहे यातून त्यांचे सक्षमीकरण होईल.