अहमदाबादच्या शेखपुरा येथील स्थानिक ४७ मजुरांना एका फॅक्ट्रीमध्ये बंधक बनवून ठेवण्यात आलं असून त्यांना मारहाण केली जात आहे. अशी माहिती या ठिकाणाहून पळून बिहारमध्ये आलेल्या काही मजुरांनी सांगितली. गेल्या आठवड्यात गुजरातच्या साबरकंठा जिल्ह्यात १४ महिन्यांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली. ज्यानंतर गुजराती विरूद्ध उत्तर भारतीय असा संघर्ष गुजरातमध्ये सुरु झाला आहे. उत्तर भारतीयांवर सातत्याने हल्ले होत आहेत. त्यामुळे गुजरातमधून उत्तर भारतीय पळून बिहारला जात आहेत.

ज्या लोकांना बांधून ठेवण्यात आलं आहे त्या मजुरांना मारहाण केली जाते आहे असेही तक्रार करणाऱ्या मजुरांनी सांगितले. बलात्काराची घटना समोर आल्यानंतर गुजरातच्या अनेक भागांमध्ये असणारे उत्तर भारतीय आणि बिहारी हे गुजराती लोकांच्या निशाण्यावर आहेत. ज्यामुळे अनेकांनी पलायन करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मागील ४८ तासांमध्ये या घटना कमी झाल्याचे म्हटले आहे.

बिहारी आणि उत्तर भारतीयांवर हल्ला केल्याप्रकरणी आत्तापर्यंत ३०० पेक्षा जास्त लोकांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. यावरून राजकीय आरोपही होऊ लागले आहेत. महाराष्ट्रातून जेव्हा परप्रांतीयांना मारहाणीच्या घटना झाल्या तेव्हा राज ठाकरेंचे आंदोलन दिसत असले तरीही त्यामागे काँग्रेसचा हात होता असा आरोप केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केला. तसेच गुजरातमध्ये जे काही घडते आहे त्यालाही काँग्रेस जबाबदार आहे असेही गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे.

तर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. एक दिवस मोदीही वाराणासीत येतील हे त्यांनी विसरू नये असा इशाराच निरुपम यांनी दिला.