‘आम्ही 4G वापरतोय’, हे सांगताना तुम्हाला फार आनंद होत असेल. पण यात आनंद वाटण्यासारखी गोष्ट नाहीये कारण भारतात ४जीचा वेग हा जगभरातील इतर देशांच्या तुलनेत कमालीचा स्लो आहे. आश्चर्य म्हणजे हा वेग पाकिस्तानपेक्षाही कमी आहे असं ‘ओपनसिग्नल’ या मोबाइल अॅनालिटिक्स कंपनीने आपल्या सर्वेक्षणात म्हटलं आहे.

एकीकडे भारत डिजिटल होत आहे. रिलायन्स जिओनंतर तर अनेक टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या डेटा पॅक, वॉईस कॉल्सच्या किमती घटवल्या आहेत. त्यामुळे इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण असं असलं तरी ओपनसिग्नल या मोबाइल अॅनालिटिक्स कंपनीने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार देशात ४जीचा वेग हा सर्वाधिक कमी आहे. हा वेग पाकिस्तान, अल्जेरिया, कझाकस्तान आणि ट्युनिशिया या देशांपेक्षाही कमी आहे. ६ खंडातील जवळपास ८८ देशांतील ४जी डाऊनलोड स्पीडची चाचणी केली यात भारत देश खूपच मागे असल्याचं समोर आलं आहे.

२ जी सेवांवरून भारतानं ४जी सेवांपर्यंत आपलं जाळं विस्तारलं आहे ही बाब चांगली असली तरी जगाच्या तुलनेत मात्र देशात या सेवेचा वेग मात्र कमीच आहे. भारतात ४जीचा वेग सरासरी ६ mbps इतका आहे. अनेकदा तो यापेक्षाही कमी असतो. तर पाकिस्तानमध्ये मात्र हा वेग भारतापेक्षा दुप्पटीहून अधिक म्हणजे १४ mbps इतका आहे. अल्जेरियामध्येही हा वेग ९ mbps आहे, असंही ‘ओपनसिग्नल’नं म्हटलं आहे.  ४जी डाऊनलोडच्या बाबतीत सिंगापूर, नेदरलँड, नॉर्वे हे आघाडीवर आहेत. येथे ४जी डाऊनलोड वेग हा अनुकमे ४४, ४२ आणि ४१ mbps आहे. गेल्यावर्षी ‘ओक्ला’ संस्थेनं देखील मोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत जगात १०९ व्या क्रमांकावर असल्याचं म्हटलं होतं. इतकंच नाही तर याही बाबतीत श्रीलंका, नेपाळ यांसारखे देश भारतापेक्षा आघाडीवर होते ही बाबही यात अधोरेखित करण्यात आली होती.