कामाचा अतिरिक्त ताण, एकटेपणाची भावना यांसारख्या गोष्टींमुळे गेल्या काही महिन्यांत अनेक डॉक्टरांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अशातच गेल्या आठवडाभरात दिल्लीतल्या ‘एम्स’ रुग्णालयातील पाच डॉक्टरांना मानसोपचार विभागात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे हे डॉक्टर तणावखाली असल्याचं समजत आहे.
गेल्या आठवड्यात या रुग्णालयाच्या अॅनॅस्थेशिया विभागातील एका निवासी डॉक्टरांने तणावाखाली येत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण सहकाऱ्याच्या सतर्कतेमुळे त्याचे वेळीच प्राण वाचवण्यात आले. कामाच्या तसेच वैयक्तिक आयुष्यातील तणावामुळे डॉक्टर टोकाचं पाऊल उचलून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणूनच निवासी डॉक्टर संघटना आणि रुग्णालयातील काही अनुभवी डॉक्टरांनी डॉक्टरांसाठी हेल्पलाईन सुरू करण्याची मागणी केली होती, पण यामागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं असल्याचाही आरोप होत आहे.
इंडिया टुडेच्या हवाल्यानुसार गेल्या आठवडाभरात रुग्णालयातील कमीत कमी पाच डॉक्टरांवर मानसोपचार सुरू आहेत. एम्समधल्या निवासी डॉक्टर संघटनेचे प्रमुख डॉक्टर हरिजित यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक डॉक्टरांनी याआधीही मानसोपचार घेतले असल्याचं समजत आहे. पण,हे प्रमाण खूपच कमी होतं मात्र आता परिस्थिती बदलली असून कामाच्या ताणामुळे आता मानसोपचार घेणाऱ्या डॉक्टरांची संख्या वाढली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 16, 2018 10:33 am