हरित लवादाकडून कारवाई मात्र सांस्कृतिक महोत्सवास परवानगी
आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक व अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना यमुना नदीकिनारी शुक्रवारपासून तीन दिवसांचा आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु राष्ट्रीय हरित लवादाने या प्रकरणी आर्ट ऑफ लिव्हिंगला पर्यावरण भरपाईपोटी ५ कोटी रुपये दंड केला आहे. हा महोत्सव आयोजित करताना कुठलेही पर्यावरण परवाने घेतले नाहीत, असे सांगून लवादाने आधी या महोत्सवास हरकत घेतली होती. या महोत्सवाच्या तयारीसाठी लष्कराची मदत का घेण्यात आली, यावर विरोधकांनी संसदेतही सरकारला घेरले.
हरित लवादाने या प्रकरणी दिल्ली विकास प्राधिकरणालाही ५ लाख व दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीला १ लाख रुपये दंड ठोठावला. अशी परवानगी यापुढे देऊ नये, अशी तंबीही लवादाने या दोन्ही संस्थांना दिली आहे. राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष स्वतंत्रकुमार यांच्या नेतृत्वाखालील पीठाने हा निर्णय केला.
तोडमोडीची कला..
* महोत्सवामुळे पूरप्रवण क्षेत्रात गंभीर बदल. नदीच्या नैसर्गिक प्रवाहावरही परिणाम. काठच्या वनस्पतींचेही उच्चाटन.
* महोत्सवात सात एकरांचे व्यासपीठ उभारले असले तरी ते असुरक्षित असल्याचा पालिकेचा दावा.
* महोत्सवासाठी केलेले सर्व बांधकाम तोडून परिसर पूर्ववत करण्यासाठी १०० कोटींचा खर्च येईल, असे तज्ज्ञांचे मत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 10, 2016 12:11 am