येथील कनोटा विभागात एका बिगरशासकीय संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या निवासी शाळेतील पाच मुक्या, बहिऱ्या आणि अनाथ मुलींवर बलात्कार करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी ‘आवाज फाऊण्डेशन’ संस्थेच्या संचालकांसह अन्य चार जणांना अटक केली आहे, असे पोलीस उपायुक्त श्वेता धनकर यांनी सांगितले. या मुली १५ ते १७ वर्षे वयोगटातील आहेत.
सदर मुली या संस्थेच्या वसतिगृहात राहणाऱ्या असून तेथील कर्मचारी अशोक आणि सुरेश अनेक दिवसांपासून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करीत होते. या मुलींवर बलात्कार करून त्यांना मारहाण करण्यात आली. याबाबत मुलींनी संस्थेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तेव्हा त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.
या मुली गांधीनगर येथील बाल आश्रयालयातील असून त्यांना निवासी शाळेत पाठविण्यात आले होते. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून ही संस्था चालविण्यात येत असून तेथे त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आणण्यात आले होते, असे श्वेता धनकर म्हणाल्या.
आपले प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या मुली पुन्हा बाल आश्रयालयात आल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. संस्थेच्या अधिकारी अल्पना शर्मा आणि गीता, सुरेश आणि अशोक या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे, असेही त्या म्हणाल्या.
सदर वसतिगृहात १०९ विद्यार्थी असून ते गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. दरम्यान, काही संस्थांच्या वतीने शनिवारी गांधीनगर येथे निदर्शने करण्यात आली आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.