घरगुती वापराचा पाच किलोचा गॅस सिलिंडर आता महानगरांमधील निवडक पेट्रोल पंपावर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी या प्रस्तावाला बुधवारी मंजुरी दिली. सुरुवातीला ही योजना दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि बेंगळुरू या निवडक शहरांमध्ये लागू करण्यात येणार आहे.
इंधन विक्री करणाऱया तेल कंपन्यांकडून चालविण्यात येणाऱया निवडक पेट्रोल पंपावर सुरुवातीला हे सिलिंडर विकण्यात येतील. हा सिलिंडर ग्राहकांना बाजारभावाप्रमाणे विकत घ्यावा लागणार आहे. त्यावर कोणतेही सरकारी अनुदान देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या सिलिंडरसोबत ग्राहकांना रेग्युलेटर मात्र देण्यात येणार नसल्याचे सरकारी निवेदनात म्हटले आहे.
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदूस्थान पेट्रोलियम यांचे एकत्रितपणे देशभरात १४४० पेट्रोल पंप आहेत. त्यापैकी वर दिलेल्या शहरांतील निवडक पंपावर हे सिलिंडर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.