बांगलादेशातील विरोधी पक्षाने पुकारलेल्या संपाच्या वेळी विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात पाच जण ठार झाले; तर ५० जण जखमी झाले आहेत. पुढील सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत तटस्थ काळजीवाहू सरकारची मागणी प्रमुख विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि त्याचा सहकारी पक्ष जमाते-ए-इस्लामी यांनी केली आहे. त्यासाठी रविवारी ६० तासंचा संप पक्षाने पुकारला आहे.
ढाक्यात सकाळपासून हिंसाचाराला सुरुवात झाली. यात वाहनांची जाळपोळ झाली. क्रूडबॉम्बचे स्फोट करण्यात आले. चित्तगाव, राजशाही, नाटोरी, बोग्रा या शहरांमध्येही विविध भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात बीएनपीच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला़