भारतामधील २०१५ सालातील प्रदूषणाबाबत ‘लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकाचा अहवाल

हवामान बदलाच्या परिणामांवर चर्चा करण्यासाठी जर्मनीतील बॉन येथे ६ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या जागतिक परिषदेच्या पूर्वी मंगळवारी लॅन्सेट नावाच्या प्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिकाने एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात आकाराने २.५ मायक्रॉनपेक्षा लहान कणांच्या (पीएम २.५) प्रदूषणामुळे भारतात २०१५ साली ५ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे प्रदूषणकारी अतिसूक्ष्म कण औद्योगिक किंवा वाहनांच्या प्रदूषणातून तयार झालेले नसून घरगुती वातावरणात स्वयंपाकासाठी लाकडांचा किंवा शेणकुटांचा वापर केल्याने तयार झाले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका घरातील महिलांना बसला आहे. संशोधकांना ही बाब यापूर्वीही माहित होती पण आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

लॅन्सेटच्या अहवालानुसार भारतात २०१५ साली हवा, पाणी जमिनीच्या प्रदूषमामुळे २५ लाख नागरिकांचा मृत्यू झाला. म्हणजेच त्या वर्षी भारतात एड्स, मलेरिया व क्षयरोग यांनी झालेल्या एकत्रित मृत्यूंपेक्षा प्रदूषणामुळे अधिक मृत्यू झाले. त्यापैकी ५ लाख २४ हजार ६८ मृत्यू ‘पीएम २.५’  (२.५ मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचे पार्टिक्युलेट मॅटर) नावाने ओळखल्या जाणाऱ्या अतिसूक्ष्म प्रदूषणकारी कणांमुळे झाले.

हे कण मानवी केसाच्या व्यासाच्या ३ टक्के आकाराचे असतात आणि सहजपणे रक्तात मिसळून आजार उत्पन्न करू शकतात. हे कण घरात सरपणासाठी व स्वयंपाकासाठी वापरलेल्या लाकडांचे व शेणकुटांचे ज्वलन, कोळशावर आधारित वीजनिर्मिती केंद्रे आणि वाहनांचे धूर यातून बाहेर पडतात. पण अन्य दोन कारणांपेक्षा घरगुती ज्वलनातून निर्माण झालेल्या पीएम २.५ कणांनी भारतात जास्त बळी घेतले होते. २०१५ साली भारतात अशा घरगुती कारणाने निर्माण झालेल्या पीएम २.५ कणांनी १ लाख २४ हजार २०७ जणांचा मृत्यू झाला. तर वीजनिर्मिती केद्रातील कोळशाच्या ज्वलनातून तयार झालेल्या पीएम २.५ कणांनी ८० हजार ३६८ आणि वाहनांच्या धुरातून निर्माण झालेल्या पीएम २.५ कणांनी ५० हजार ९०५ जणांचा बळी घेतला. यातून  ग्रामीण भागांत घरात वापरले जाणारे लाकडी सरपण आणि तेथील वायुविजनाच्या (हवा खेळती राहण्याच्या) अपुऱ्या सुविधा यांनी इतक्या मोठय़ा प्रमाणात बळी घेतल्याचे दिसून आले.

लॅन्सेटच्या अहवालानुसार २०१५ साली आशियातील २१ देशांत हवेच्या प्रदूषणामुळे १९ लाख जण मरण पावले आणि त्यातील बहुसंख्य मृत्यू चीन व भारतात झाले. चीनमध्ये ९ लाख ६६ हजार ७९३ जण मरण पावले. पण त्याचे कारण प्रदूषणाच्या औद्योगिक स्रोतांमध्ये होते. भारतात घरातील दूषित हवेने अधिक बळी घेतले होते.