देशातील करोना रुग्णांची संख्या गेल्या २० दिवसांत पाच लाखांनी वाढली आहे. देशात २९ फेब्रुवारीला पहिला रुग्ण आढळल्यानंतर रुग्णसंख्या पाच लाखांवर जाण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागला. २६ जूनला पाच लाख असलेली बाधितांची संख्या शुक्रवारी १० लाख ३ हजार ८३२ झाली. म्हणजेच देशात अवघ्या २० दिवसांत दुप्पट रुग्णवाढ झाली.

देशात दहा लाखांमागे ७२७ करोना रुग्ण असून जगाच्या सरासरीपेक्षा हे प्रमाण ४ ते ८ पटीने कमी आहे. एकूण ३ लाख ४२ हजार ७५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दहा लाखांमागे १८ रुग्णांचा मृत्यू झाला असून हे प्रमाण जगात सर्वात कमी आहे. देशात करोनामुळे एकूण २५ हजार ६०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. लक्षणे नसलेल्या वा सौम्य लक्षणे असलेल्या ८० टक्के रुग्णांचे घरगुती विलगीकरण केले जात आहे. त्यांच्यावर सातत्याने देखरेखही ठेवली जात आहे. एकूण उपचाराधीन रुग्णांपैकी १.९४ टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. ०.३५ टक्के रुग्णांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले असून २.८१ टक्के रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

२४ तासांत..

गेल्या २४ तासांमध्ये ३४ हजार ९५६ नव्या रुणांची नोंद झाली. ६ लाख ३५ हजार ७५७ रुग्ण करोनामुक्त झाले असून गेल्या २४ तासांमध्ये २२ हजार ९४२ रुग्ण बरे झाले. बरे होण्याचे प्रमाण ६३.३३ टक्के झाले आहे. देशात २४ तासांमध्ये ६८७ रुग्णांचा मृत्यू झाला.

केरळमध्ये समूह संसर्ग : केरळमधील तिरुवनंतपुरम येथील दोन गावांत समूह संसर्ग होत असल्याचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी शुक्रवारी सांगितले. गेल्या काही दिवसांत सर्वाधिक रुग्ण या गावांमध्ये आढळले आहेत. केरळमध्ये ११ हजार ६६ इतकी रुग्णसंख्या आहे.

राज्यात २४ तासांत आठ हजार रुग्ण

राज्यात लागोपाठ दुसऱ्या दिवशी आठ हजारांपेक्षा अधिक रुग्णांचे निदान झाले. राज्यातील रुग्णसंख्या तीन लाख तर मुंबईतील रुग्णसंख्या एक लाखांच्या जवळ येऊन ठेपली आहे. दिवसभरात ८३०८ रुग्ण आढळले.