जगात करोनाने घेतलेल्या बळींची संख्या आता पाच लाख झाली असून बाधितांची संख्या एक कोटीवर गेली आहे. रोज नवीन रुग्ण सापडत आहेत. गेल्या २४ तासात विक्रमी म्हणजे १ लाख ८९ हजार रुग्ण सापडल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. काही देशांच्या सरकारांनी टाळेबंदी उठवली असली तरी अजून करोनाचा यापेक्षा वाईट काळ  बाकी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कोविड १९ संसर्गाने टेक्सासमध्ये गेल्या काही आठवडय़ात पुन्हा गंभीर वळण घेतले असल्याचे गव्हर्नर ग्रेग अ‍ॅबॉट यांनी म्हटले आहे. तेथे मेच्या सुरुवातीला उद्योग सुरू करण्यात आले होते, पण या शुक्रवारी बार व हॉटेल्स बंद करण्यात आले.

कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी सात जिल्ह्य़ातील बार उघडण्याचा निर्णय मागे घेतला, त्यात लॉसएंजलिसचा समावेश आहे. बार व हॉटेल्स ताबडतोब बंद करण्याचा आदेश त्यांनी दिला असून इतर आठ ठिकाणीही तसेच आदेश देण्यात आले आहेत. फ्लोरिडातील समुद्रकिनारेही पुन्हा बंद करण्यात आले असून फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसँटिस यांनी सांगितले,की लोक एकमेकांच्या जवळ येतात त्यामुळे करोनाचा प्रसार वाढत आहे. दक्षिण आफ्रिकेचे आरोग्य मंत्री झ्वेलिनी मिखीन्झ यांनी सांगितले,की कामावर जेथे लोक परत आले तेथे करोना वाढत असून येत्या काही आठवडय़ात देशातील रुग्णालयांची क्षमता संपणार आहे.

स्वीस नाइटक्लबमुळे करोना वाढत असून ब्रिटनसह युरोपात करोनाचा प्रसार वाढत आहे. अमेरिका, लॅटिन अमेरिका, भारत, पोलंड, फ्रान्स या देशातही संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी फ्लोरिडा व अ‍ॅरिझोनाचा दौरा अर्धवट सोडला आहे.जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत करोनाने पाच लाख बळी घेतले आहेत. त्यातील सव्वालाख अमेरिकेतील आहेत. ब्राझीलमध्ये ५७ हजार बळी गेले आहेत. आतापर्यंत १ कोटी लोकांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.