छत्तीसगडमधील सर्वाधिक नक्षलग्रस्त भाग असलेल्या सुकमा येथून पाच नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना मंगळवारी यश आले आहे. विशेष म्हणजे या नक्षलवाद्यांकडील मोठा शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडे आढळलेल्या शस्त्रसाठ्यात भूसुरंग स्फोटाचे साहित्य असल्याचे निदर्शनास आल्याने ते कोणत्यातरी मोठ्या घातपाताच्या तयारीत होते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

पोलिसांच पथक एलारमडगू गावाच्या दिशेने जात असताना त्यांना या मार्गावर काही संशयीत हालचाल दिसली. त्यानुसार पोलिसांनी मोठ्या शिताफीने या पाच जणांना पकडले. यावेळी त्यांच्याकडे २० मीटर लांब तार, १२ पेंसील सेल, ३ जिलेटीन रॉड व बॉम्ब बनवण्याचे सामान आढळून आले. अटक करण्यात नक्षलवाद्यांची करतम कोसा उर्फ डाकी, माडवी हुंगा, पोडियम सूला, माडवी गंगा आणि कवासी हुंगा अशी नावं असल्याचे सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकार व राज्य सरकारकडून नक्षलग्रस्त भागात मोठ्याप्रमाणत नक्षल निर्मूलन अभियान राबले जात आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारीच नक्षलवादी सक्रीय असलेल्या दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेत, या अभियानाचा आढावा घेतला होता. या बैठकीत त्यांनी नक्षलवाद्यांच्या समस्येवरील प्रभावी तोडग्यांवर चर्चा केली होती. शिवाय अभियानाला गती देण्याचे व नक्षलींची पाळमुळ शोधून ती नष्ट करण्याचेही आदेश दिले होते.

या बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी छत्तीसगडमध्ये या अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या विशेष पोलिस दलाने ही मोठी कारवाई केली. पोलिसांनी अटक केलेले हे पाच आरोपी मोठा घडवण्याच्या तयारी होते. एका खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. नक्षलींना शोधण्यासाठी संपूर्ण परिसरात डीआरजीच्या पथकाकडून सातत्याने अभियान राबवले जात आहे.