11 December 2017

News Flash

अरूणाचल प्रदेशात भारतीय हवाईदलाचे हेलिकॉप्टर कोसळले; सात जवानांचा मृत्यू

आज सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

एएनआय | Updated: October 6, 2017 2:54 PM

Mi17 V5 helicopter crashed in Arunachal Pradesh : रशियन बनावटीच्या या हेलिकॉप्टरचा वापर प्रामुख्याने लष्करी मोहिमा आणि सैन्याच्या सामानाची ने-आण करण्यासाठी होतो.

अरूणाचल प्रदेशातील तवांग परिसरात शुक्रवारी सकाळी भारतीय हवाईलदलाचे ‘एमआय १७ व्ही ५’ हे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत हवाई दलाच्या सात जवानांचा मृत्यू झाला आहे. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.  ‘एमआय १७ व्ही ५’ हे हेलिकॉप्टर हे भारतीय हवाईदलाचा कणा मानले जाते. रशियन बनावटीच्या या हेलिकॉप्टरचा वापर प्रामुख्याने लष्करी मोहिमा आणि सैन्याच्या सामानाची ने-आण करण्यासाठी होतो. त्यामुळे आजचा अपघात नेमका कशामुळे झाला याचा सध्या तपास सुरू आहे. काही वेळापूर्वीच या अपघाताच्या चौकशीचे आदेशही लष्करी वरिष्ठांकडून देण्यात आल्याचे समजते.

तवांग हा परिसर भारत-तिबेट सीमारेषेपासून १२ किलोमीटर अंतरावर आहे. मोठ्या डोंगररांगा असलेला हा परिसर अतिशय दुर्गम मानला जातो. या परिसरात उडताना हेलिकॉप्टरच्या दिशादर्शनात अनेक अडथळे येतात.  त्यामुळेच आजचा अपघात झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर तवांगमधील एका लष्करी चौकीवर रसद घेऊन चालले होते. या परिसरातील दुर्गम ठिकाणी असलेल्या काही लष्करी ठाण्यांना केवळ हवाईमार्गेच रसद पुरवता येणे शक्य आहे. हिवाळ्यापूर्वी या सर्व लष्करी चौक्यांवर आवश्यक ती रसद साठवली जाते. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर त्याच कामगिरीवर असल्याचे सांगण्यात येते.

एमआय १७ हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय हवाईदलाचा कणा आहे. मात्र, तांत्रिक मर्यादा आणि सुट्या भागांचा तुटवडा जाणवत असल्यामुळे एमआय १७ च्या वापरावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. एमआय १७ मध्ये व्ही ५ ही यंत्रणा बसवण्यात आल्यामुळे हेलिकॉप्टर काही प्रमाणात अद्यायावत झाले होते. मात्र, तरीही प्रगत तंत्रज्ञानाच्यादृष्टीने पाहता एमआय १७ मध्ये अनेक तांत्रिक दोष होते. त्यामुळे आता हवाईदलाकडून आजच्या अपघातासाठी तांत्रिक दोष कारणीभूत होते का, हे तपासून पाहिले जाण्याची शक्यता आहे.

First Published on October 6, 2017 10:59 am

Web Title: 5 personnel dead 1 critically injured as a mi17 v5 helicopter crashed in arunachal pradesh this morning confirms indian airforce