जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातल्या माछिल सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ५ दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा दलानं ठार केलं आहे. भारतीय सुरक्षा दलाचे जवान या भागात पाहणी करण्यासाठी गेले होते, त्यावेळी त्यांना काही जणांच्या संशयास्पद हालचाली जाणवल्या. सीमारेषा आणि नियंत्रण रेषेजवळून काही जण भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते.

सुरक्षा दलाच्या जवानांना याची माहिती मिळताच त्यांनी गोळीबार सुरू केला, ज्यानंतर ५ दहशतवाद्यांनीही गोळीबार करायला सुरूवात केली. मात्र भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार करणाऱ्या पाचही दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. हे सगळे दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात होते. या सगळ्यांकडून सुरक्षा दलानं शस्त्रांचा साठाही जप्त केला आहे.

याआधीच्या एका घटनेत २३ जुलै रोजीही काही दहशतवाद्यांनी भारताची नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली होती. ज्यानंतर पुलवामामध्ये सैन्यदलानं एक शोध मोहिमही राबवली होती. या वर्षाच्या सुरूवातीपासून म्हणजेच जानेवारी २०१७ ते ऑगस्ट २०१७ पर्यंत  भारतीय सैन्यदलानं दहतवाद्यांच्या घुसखोरीचे २२ प्रयत्न हाणून पाडले आहेत आणि १०२ दहशतवाद्यांना ठार केलं आहे.

भारतीय सैन्यदलाकडून सध्या ‘दहशतवादी शोधा आणि ठार करा’ अशी एक मोहिमही सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेतही दहशतवाद्यांनचा खात्मा करण्यात येतो आहे तर दुसरीकडे घुसखोरीचे आणि हल्ल्याचे प्रय़त्नही हाणून पाडले जात आहेत.