पाच हजार कोटींचा घोटाळा करुन फरार झालेला स्टर्लिंग बायोटेकचा मालक नितीन संदेसरा याला दुबईतून ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं समोर आलं आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार, पाच हजार कोटींचा घोटाळा केल्यामुळे सीबीआय आणि सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) रडारवर असणारा नितीन संदेसरा दुबईत नसून नायजेरियात लपला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितीन संदेसरा आपला भाऊ चेतन, वहिनी दिप्तीबेन आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत नायजेरियाला पळून गेल्याचं सीबीआय आणि ईडीच्या सुत्रांकडून समोर आलं आहे. भारताचा नायजेरियासोबत कोणताही प्रत्यार्पण करार नसल्याने सध्या तरी नितीन संदेसरा याला भारतात आणणं शक्य होणार नाही.

एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, ‘ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नितीन संदेसरा याला दुबईत ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त आलं होतं. मात्र ही चुकीची माहिती आहे. त्याला कधीही दुबईत ताब्यात घेण्यात आलं नाही. तो आणि त्याचं कुटुंब त्याआधीच नायजेरियाला गेलं असल्याची शक्यता आहे’.

दरम्यान, तपास यंत्रणा दुबई प्रशासनाला विनंती पाठवणार असून तिथे नितीन संदेसरा यांची उपस्थिती आढळल्यास अटक करण्यास सांगणार आहे. याशिवाय संदेसरा कुटुंबाविरोधात इंटरपोल रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याचाही प्रयत्न आहे. संदेसरा कुटुंबाने नायजेरियाला जाण्यासाठी भारतीय पासपोर्टचा वापर केला का यासंबंधी अधिकृत माहिती मिळालेली नसून तपास सुरु आहे.

सीबीआय आणि ईडीने वडोदरा येथील स्टार्लिंग बायोटेकचे संचालक नितीन, चेतन आणि दिप्ती संदेसरा, राजभूषण ओमप्रकाश दिक्षित, विलास जोशी, चार्टर्ड अकाऊंटंट हेमंत हठी, आंध्र बँकेचे माजी संचालक अनुप गर्ग आणि काही अज्ञातांविरोधात बँकांची पाच हजार कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

संदेसरा यांनी भारतात आणि परदेशात जवळपास ३०० बोगस कंपन्या उभारल्या होत्या. बँकांकडून घेतलेलं कर्ज या बोगस कंपन्यांमध्ये वळवण्यात येत होतं. पैशांची अफरातफर करण्यासाठी खोट्या आणि बेनामी कंपन्या सुरु करणे, बॅलेन्स शीटसोबत छेडछाड, खोटा टर्नओव्हर दाखवणे असले प्रकार केले जात होते. या कंपन्या स्टार्लिंग ग्रुपच्या कंपन्यांमधील सदस्य नियंत्रित करत होते. ज्यांना बनावट संचालक म्हणून उभं केलं जात होतं. बेनामी कंपन्या आणि स्टार्लिंग ग्रुपमध्ये व्यवहार केल्याचं दाखवत कर्जाची रक्कम वळवली जात होती. तसंच अजून कर्ज मिळावं यासाठी टर्नओव्हरची रक्कम फुगवून सांगितली जात होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 thousand crore scam accused nitin sandesara fled to nigeria
First published on: 24-09-2018 at 10:47 IST