पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला गळती लागली आहे. काही महिन्यांपासून तृणमूलचे नेते भाजपाची वाट धरताना दिसत आहेत. त्यात आता आणखी पाच नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शाह यांच्या उपस्थित कमळ हाती घेतलं. दिल्लीत या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भाजपाला आणखी राजकीय बळ मिळालं आहे. तर तृणमूल काँग्रेस आणखी एक हादरा बसला आहे.

राजीब बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि रुद्रनील घोष यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर पाचही नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर अमित शाह यांनी ट्विट करून याची माहिती दिली.

अमित शाह म्हणाले,”तृणमूलचे माजी नेते राजीब बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि रुद्रनील घोष यांनी दिल्लीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मला विश्वास आहे की, सोनार बांग्लासाठी भाजपाच्या लढाईला हे सर्वजण आणखी मजबूत करतील,” असं शाह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

या नेत्यांच्या प्रवेशावेळी पूर्वाश्रमीचे तृणमूल काँग्रेस व सध्या भाजपात असलेले नेते मुकूल रॉय आणि भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय हे उपस्थित होते. राजीब बॅनर्जी यांनी अलिकडेच मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्याचबरोबर त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला होता. तर वैशाली दालमिया यांची तृणमूलकडून पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी हकालपट्टी करण्यात आली होती. प्रबीर घोषाल यांनाही तृणमूलचा राजीनामा दिलेला आहे. त्यातच आता तृणमूलचे बंडखोर नेते पार्थसारथी चट्टोपाध्याय हे सुद्धा भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.