कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सत्तारूढ तृणमूल पक्षाला सोमवारी आणखी खिंडार पडले, तृणमूल काँग्रेसच्या पाच विद्यमान आमदारांनी पक्षाला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निकटच्या सहकारी आणि चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या सोनाली गुहा आणि रवींद्रनाथ भट्टाचार्य यांना तृणमूल काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचप्राणे चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले जतू लाहिरी आणि माजी फुटबॉलपटू दीपेन्दू विश्वास यांनीही तृणमूल काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे शीतल सरदार या तृणमूल काँग्रेस आमदारानेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, मालदा जिल्हा परिषदेतील २२ सदस्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने ३८ सदस्य असलेली ही जिल्हा परिषद भाजपच्या नियंत्रणाखाली आली आहे. बंगाली अभिनेत्री तनुश्री चक्रवर्ती यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

..तर देशालाही मोदींचे नाव : ममता बॅनर्जी

पंतप्रधान नरेंद्र मोदी तृणमूल काँग्रेस सरकारविरुद्ध अपप्रचार करून अफवा पसरवत असल्याबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी मोदींना फटकारले. राज्यातील २९४ मतदारसंघांत या वेळी दीदी विरुद्ध भाजप असा सामना मतदार पाहतील, असेही त्या म्हणाल्या. इतकेच नव्हे तर एक दिवस देशाला नरेंद्र मोदी यांचे नाव दिले जाईल आणि तो दिवसही दूर नाही, असेही त्या म्हणाल्या. कोविड-१९च्या प्रमाणपत्रांवर मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आले त्यावरून ममतांनी हा हल्ला चढविला. पश्चिम बंगालमध्ये सलग तिसऱ्या वेळी आपणच सत्तेवर येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.