राजधानी दिल्लीत चार महिन्यांपूर्वी झालेल्या घृणास्पद बलात्काराच्या घटनेची शुक्रवारी पुनरावृत्ती झाली. पूर्व दिल्लीतील गांधीनगर भागात एका पाच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून तिला गंभीर जखमी करण्याच्या निर्दयी घटनेमुळे दिल्लीकरांचा संताप उफाळून आला. संबंधित मुलीच्या शेजारी राहाणाऱ्या मनोज या तीस वर्षीय तरुणावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.
या प्रकरणी संशयित तरुणाच्या नातेवाईकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपीची ओळख पटली असून तो बिहारच्या मुझफ्फरपूर येथून दिल्लीत आला होता. त्याचे नाव मनोज असून पोलिसांनी त्याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवला आहे.
गांधीनगर भागात या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असताना दिल्लीच्या आरोग्य मंत्री ए. के. वालिया तसेच पूर्व दिल्लीचे काँग्रेसचे खासदार संदीप दीक्षित यांनी संबंधित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. संतप्त जमावाने त्यांच्याशी धक्काबुक्की करीत त्यांना तिथून हुसकावून लावले. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.

मृत्युशी झुंज
या बालिकेला एम्स इस्पितळात दाखल करण्यात आली असून, तिची मृत्युशी झुंज सुरू आहे. या प्रकरणाची वाच्यता करू नये म्हणून पोलिसांनी दोन हजार रुपये देऊ केले होते, असा आरोप तिच्या वडिलांनी केला. शस्त्रक्रियेदरम्यान तिच्या पोटातून तेलाची बाटली तसेच मेणबत्ती निघाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

रक्तबंबाळ अवस्थेत सुटका
या बालिकेचे १५ एप्रिलला अपहरण करण्यात आले आणि शेजारच्याच तीस वर्षीय तरुणाने तिला दोन दिवस डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार केल्याचा संशय आहे. रक्तबंबाळ अवस्थेत या मुलीची एका खोलीतून सुटका करण्यात आली. तिच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या. हा संशयित तरुण फरार आहे.