करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला असून रुग्णसंख्येसोबतच मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येनेही उच्चांक गाठले. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका सर्वसामान्यांसोबतच करोनाविरोधातील लढाई लढणाऱ्या डॉक्टरांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, करोनाच्या दुसऱ्या लाटेत २४४ डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. रविवारी ५० डॉक्टरांच्या मृत्यूची नोंद झाली. सर्वाधिक मृत्यू बिहार (६९), उत्तर प्रदेश (३४) आणि दिल्लीत (२७) झाले आहेत. यापैकी फक्त तीन टक्के डॉक्टरांचं लसीकरण झालं होतं.

करोना रुग्णांसाठी काम करणाऱ्या दिल्लीमधील गुरु तेग बहादूर रुग्णालयातील २६ वर्षीय डॉक्टर अनस मुजाहिदला करोनामुळेच आपला जीव गमवावा लागला. करोनाची लागण झाल्यानंतर काही तासांतच त्याचं निधन झालं. करोनाच्या दुसऱ्या लाटेत जीव गमावणाऱ्या २४४ डॉक्टरांमधील अनस सर्वात तरुण डॉक्टर आहे. पहिल्या लाटेत गेल्यावर्षी ७३६ डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत देशभरात करोनामुळे जवळपास एक हजार डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला आहे.

आणखी वाचा- करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

अनसच्या मृत्यूनंतर त्याचा मित्र आणि सहकारी डॉक्टर आमीर सोहेलला मोठा धक्का बसला आहे. अनसला घसा दुखणे अशी काही मध्यम लक्षणं जाणवत होती. रुग्णालयात चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. काही वेळातच अनस खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचं लसीकरण झालं नव्हतं. “हा आमच्यासाठी खूप मोठा धक्का आहे. त्याला कोणतीही व्याधी नव्हती. तसंच आरोग्यासंबंधित कोणतीही समस्या नसल्याचं त्याच्या कुटुंबाने सांगितलं आहे. त्याच्या मृत्यूने आम्हाला धक्का बसला असून हे कसं झालं हेच समजत नाहीये,” असं डॉक्टर आमीर सोहेलने म्हटलं आहे.

देशात लसीकरण मोहीम सुरु होऊन पाच महिने झाले आहेत. मात्र अद्यापही ६६ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचं पूर्ण लसीकरण झालं आहे. डॉक्टरांनी लस घ्यावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशनने सांगितलं आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर जयेश लेले यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, “रविवारी ५० डॉक्टरांचा मृत्यू आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २४४ डॉक्टरांनी जीव गमावणं आमच्यासाठी खूप दुर्दैवी आहे”.

आणखी वाचा- करोना बळींचा उच्चांक! देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू

“डॉक्टरांची संख्या कमी असून त्यांच्यावर प्रचंड ताण आहे. कधी कधी तर विश्रांती न घेता ते सलग ४८ तास काम करतात. यामुळे त्यांच्या त्रासात भर पडत असून लागण झाल्यानंतर मृत्यू होत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी सरकारने उपाययोजना करणं गरजेचं आहे,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशन करोनामुळे एक हजार डॉक्टरांचा मृत्यू झाले असल्याचं सांगत असताना ही संख्या अजून जास्त असण्याची शक्यता आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन फक्त त्यांच्या साडे तीन लाख सदस्यांचा रेकॉर्ड ठेवतं. पण भारतात १२ लाखांहून अधिक डॉक्टर आहेत.