रमझानच्या काळात दिल्लीच्या निजामुद्दीन मरकज मशिदीत एका दिवशी पाच वेळा ५० जणांना नमाज पढण्याची परवानगी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने दिली.

मशीद बंगले वालीमध्ये केवळ पहिल्या मजल्यावर एका दिवशी पाच वेळा ५० जणांना नमाज पढण्याची परवानगी द्यावी, असा आदेश न्या. मुक्ता गुप्ता यांनी निजामुद्दीन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिला.

या मशिदीतील अन्य मजल्यांवरही नमाज पढण्याची परवानगी द्यावी आणि भाविकांच्या संख्येतही वाढ करावी, अशी विनंती दिल्ली वक्फ मंडळाच्या वतीने वकील रमेश गुप्ता यांनी केली होती ती न्यायालयाने फेटाळून लावली.

मात्र त्यासाठी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. अशा प्रकारचा अर्ज सादर करण्यात आल्यास कायद्यानुसार ठाण्यातील अधिकारी निर्णय घेऊ शकतात, असे न्यायालयाने म्हटले आहे.

तथापि, न्यायालयाचा आदेश दिल्ली आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने (डीडीएमए) जारी केलेल्या अधिसूचनेच्या अधीन असेल, असेही स्पष्ट करण्यात आले.