देशातील ५० टक्के एटीएम मशीन्स पुढील चार महिन्यांमध्ये म्हणजेच मार्च २०१९ पर्यंत बंद पडणार आहेत. देशभरातील एटीएम मशीन्स ऑपेर्सची संस्था असणाऱ्या कॉन्फरडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने (सीएटीएमआय) ही शक्यता व्यक्त केली आहे. असे झाल्यास शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

देशात सध्या अंदाजे २ लाख ३८ हजार एटीएम मशिन्स आहेत. त्यापैकी १ लाख १३ हजार एटीएम बंद होण्याची शक्यता आहे. यातील एक लाख एटीएम हे बँकांच्या शाखांशी थेट संलग्न नसणारे म्हणजे ऑफ साईट एटीएम्स तसेच १५ हजार व्हाईट लेबल प्रकारातील एटीएम असल्याचे सीएटीएमआयच्या प्रवकत्यांनी सांगितले आहे. याचा सर्वाधिक फटका प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सवलतींचे पैसे एटीएममधून काढणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला बसेल. तर शहरीभागांमध्येही नोटबंदीनंतरचे एटीएमबाहेरील रांगा लागल्याचे चित्र पुन्हा दिसण्याची शक्यता सीएटीएमआय प्रवक्त्यांनी व्यक्त केली आहे.

देशभरातील एटीएम ऑपरेटर्ससाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहे. यामध्ये हॉर्डवेअर तसेच सॉफ्टवेअर अपडेट्सबरोबरच सर्व एटीएममधील रोख रक्कम कॅस्टेल स्वॅप प्रकाराने भरण्याचे निर्बंध घालण्यात आले आहेत. यासंदर्भातील काम सीएटीएमआयने सुरु केले आहे. या नवीन एटीएममुळे मोठ्याप्रमाणात एटीएम क्षेत्रातील नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.