योकोहामा,: जपानमध्ये नांगर टाकून असलेल्या डायमंड प्रिन्सेस जहाजावरील पाचशेहून अधिक प्रवासी चौदा दिवसांचा विलगीकरण काळ संपल्यानंतर उतरून गेले आहेत.  या जहाजावर एकूण ३७११ जण असून त्यात ५४२ जणांना विषाणूची बाधा झाली आहे.

एकूण १३८ भारतीय या जहाजावर आहेत. या जहाजावर वेगळ्या ठेवलेल्या लोकांबाबत वैज्ञानिकांनी शंका व्यक्त केली असून उलट चुकीच्या पद्धतीने विलगीकरण प्रक्रिया राबवल्याने हा विषाणू रोखला जाण्याऐवजी पसरल्याचा दावा केला आहे. जपान सरकारने मात्र विलगीकरण यंत्रणा प्रभावी असल्याचा दावा केला आहे.  या जहाजावर एकूण ७९ नवीन रुग्ण सापडले असून जहाजातून उतरलेल्या एका जपानी प्रवाशाने सांगितले की, मी मोकळा झालो. आता चांगली विश्रांती घेणार आहे. या प्रवाशांना घेण्यासाठी शहर सेवेच्या पिवळ्या वर्तुळांच्या गाडय़ा, टॅक्सी आल्या होत्या. त्यांच्याबरोबर बरेच सामानही होते. त्यांनी जहाजात अजूनही जे लोक आहेत त्यांचा खाली आल्यानंतर हात  हलवून निरोप घेतला.

या प्रवाशांना खिडक्या नसलेल्या छोटय़ा खोल्यात वेगळे ठेवण्यात आले होते. अमेरिकेचे वकील मॅट स्मिथ  यांनी जहाजावरून उतरताना आनंद व्यक्त केला. जपानमधील या जहाजावरून उतरलेल्या प्रवाशांना विमानात बसण्याची परवानगी दिल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली कारण त्यातून विषाणू पसरण्याचा धोका आहे. कोबे विद्यापीठाचे संसर्गजन्य रोग तज्ज्ञ केन्टारो इवाटा यांनी सांगितले की, जहाजावरील विलगीकरणाचा काही फायदा तर नाहीच उलट ती मोठी चूक आहे, त्यात कुठलेही नियम पाळलेले नाहीत. त्यामुळे दुय्यम संसर्ग होणार आहेत. जहाजावरील तीनशे अमेरिकी प्रवाशांना खास विमानाने मायदेशी नेण्यात आले होते. ब्रिटन, हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया या देशांच्या प्रवाशांनाही जहाजावरून मायदेशी नेले जाणार आहे.

कंबोडियातही प्रवासी परतले

कंबोडियात सिहानोकविले येथे वेस्टरडॅम जहाजावरील प्रवासी उतरले आहेत. या जहाजावरही काही रुग्ण होते. त्यातील काही प्रवाशांना पंतप्रधान हुन सेन यांनी आलिंगन देऊन फुले दिली.

भारताच्या दोघांना संसर्ग

जहाजावरील एकूण ६२१ जणांना विषाणूचा संसर्ग झाला असून दोन भारतीयांना नव्याने संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. भारताचे एकूण १३८ जण या जहाजावर असून त्यात ६ प्रवासी व १३२ कर्मचारी आहेत.