सुधारित नागरिकत्व कायदा CAA) मागे घ्या, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील शाहीनबाग येथे जोरदार आंदोलन सुरू आहे. तेथे अनेक महिला आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत. हे आंदोलक रविवारी गृहमंत्री अमित शाह यांच्या घरावर मोर्चा नेणार होते. त्यासाठी ते निघालेही होते. त्यांना अमित शाह यांची भेट घ्यायची होती. पण… त्यांना हा मोर्चा थांबवावा लागला. त्यानंतर आता शाहीनबाग येथे ”अमित शाह, हमारी सुनो…” अशी नारेबाजी केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणारे दिल्लीतील शाहीनबाग येथील पाच हजार आंदोलक रविवारी अमित शाह यांच्य घरावर मोर्चा नेणार होते. आंदोलक आपल्या मोर्चावर अडून बसलेले होते. त्यांना कोणत्याही परिस्थितीत अमित शाह यांना भेटायचेच होते. मात्र पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली आणि त्यांना परत जावं लागलं.

ज्यांना CAAबद्दल शंका आहे, ज्यांना चर्चा करावी वाटतेय, त्यांनी खुशाल मला भेटावं, असं वक्तव्य गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केलं होतं. तोच संदर्भ घेऊन शाहीनबाग येथील आंदोलक मोर्चा घेऊन अमित शाह यांच्या घरी निघाले होते. त्यांनी तसं पत्रही पोलिसांना दिलं होतं. हे पत्र, पोलीस मुख्यालयात पाठवण्यात आलं.

शाहीन बाग येथील वृद्ध महिलाही पोलिसांशी चर्चा करत होत्या. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत अमित शाह यांना भेटायचंय, असं त्यांचं म्हणणं होतं.

मात्र, अमित शाह यांची वेळ घेतलेली नसल्यानं त्याशिवाय त्यांना भेटता येत नसल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे मोर्चाला परवानगीही नाकारण्यात आली, असं पोलिसांनी स्पष्ट केलं.