नासाच्या केप्लर दुर्बिणीने ५०३ नवीन ग्रह शोधून काढले आहेत त्यातील काही वसाहतयोग्य असण्याची शक्यता आहे. नासाच्या अ‍ॅमेस रीसर्च सेंटरचे प्रकल्प व्यवस्थापक रॉजर हंटर यांनी सांगितले की, यातील काही ग्रह हे लहान आहेत व काही वसाहतयोग्य असू शकतात पण दाव्याची शहानिशा करणे आवश्यक आहे.
आताच्या या ग्रहशोधामुळे केप्लर दुर्बिणीने शोधलेल्या ग्रहांची संख्या ३२१६ झाली आहे. नंतरच्या निरीक्षणांमध्ये आतापर्यंत १३२ ग्रह खरोखर असल्याचे स्पष्ट झाले आहे, यातील अंदाजापैकी ९० टक्के ग्रह खरोखर सापडतील असा विश्वास वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.
केप्लर दुर्बिणीने मे २००९ ते मार्च २०१२ दरम्यानच्या तीन वर्षांत केलेल्या निरीक्षणात हे परग्रह सापडले आहेत.
 गेल्या महिन्यात केप्लर दुर्बिणीत बिघाड झाला असून त्यानंतर या दुर्बिणीने ग्रहांचा शोध घेतलेला नाही. साठ कोटी डॉलर किमतीची केप्लर दुर्बीण मार्च २००९ मध्ये अवकाशात पाठवण्यात आली असून आपल्या आकाशगंगेतील पृथ्वीसदृश ग्रह शोधून काढणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. बाह्य़ग्रह जेव्हा त्यांच्या मातृताऱ्याच्या समोरून जातात तेव्हा त्यांच्या प्रकाशमानतेत पडणाऱ्या फरकावरून या ग्रहांच्या अस्तित्वाचा अंदाज या दुर्बिणीच्या मदतीने घेतला जातो. एकूण दीड लाख ताऱ्यांवर रिअ‍ॅक्शन व्हिल्स या गायरोस्कोपसारख्या उपकरणाने नजर ठेवून ही दुर्बीण बाह्य़ग्रहांचा शोध घेत आहे.