उत्तर प्रदेशमध्ये ऑक्सिजनच्या अनुपलब्धतेमुळे बालकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता झारखंडमध्येही अशीच घटना घडली आहे. झारखंडच्या जमशेदपूर येथील महात्मा गांधी सरकारी रुग्णालयात ३० दिवसांमध्ये ५२ बालकांचा मृत्यू झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ही सर्व नवजात बालके आहेत. काही दिवसांपूर्वीच रांचीतील एका रुग्णालयात ११७ दिवसांमध्ये १६४ बालकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त होते. कुपोषणामुळे या मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाच्या अधिक्षकांनी दिली.

झारखंडमधील महात्मा गांधी रुग्णालयात महिन्याभरात ५२ बालकांचा मृत्यू झाला आहे. उपासमार आणि कुपोषणामुळे या मुलांना जीव गमवावा लागला आहे. कुपोषणामुळे या मुलांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने अहवालात म्हटले. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१५-१६ नुसार, झारखंडमधील पाच वर्षांखालील ४७.८ टक्के बालके कुपोषणाचा सामना करत आहेत. याशिवाय राज्यातील चार लाख बालके अतिकुपोषित असल्याचेदेखील हा अहवाल सांगतो.

राष्ट्रीय पोषण संस्थेने झारखंडमधील पाच जिल्ह्यांमधील परिस्थितीचा आढावा घेतला. यामधून ५७.२ टक्के मुलांची अपुरी वाढ झाल्याचे समोर आले. तर ४४.२ टक्के मुलांचे वजन कमी असून १६.२ टक्के मुले शारीरिकदृष्ट्या कमजोर असल्याची आकडेवारी समोर आली. झारखंडमधील चतरा, धनबाद, दुमका, गिरिडीह आणि कोडरमा जिल्ह्यातील सर्वेक्षणानंतर राष्ट्रीय पोषण संस्थेकडून ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली होती.

१०-११ ऑगस्ट दरम्यान उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील बाबा राघव दास रुग्णालयात ७० हून अधिक बालकांचा मृत्यू झाला होता. ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने ही दुर्घटना घडली होती. रुग्णालय प्रशासनाने ऑक्सिजन पुरवठादार कंपनीचे बील थकवल्याने हा प्रकार घडला. यानंतर देशभरातून उत्तर प्रदेश सरकारवर देशभरातून टीका झाली. या प्रकरणी ऑक्सिजन पुरवठादार कंपनी पुष्पा सेल्स विरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे.