भारतात विषाणूची लागण निश्चित झालेल्या रुग्णांची संख्या ३४

नवी दिल्ली : करोना रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी देशात आणखी ५२ प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. याशिवाय ५७ प्रयोगशाळा या रुग्णांचे नमुने गोळा करण्यासाठी अधिसूचित करण्यात आल्या आहेत त्यामुळे तपासणी व निदानाची सुविधा वाढणार आहे. दरम्यान देशातील निश्चित रुग्णांची संख्या आता ३४ झाली असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सीओव्हीआयडी १९ विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी सध्याच्या सुविधा अपुऱ्या पडत असल्याने आणखी  ५२  प्रयोगशाळांत नमुने तपासण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून  ५७ प्रयोगशाळांत नमुने संकलित करण्याची सोय करण्यात आली आहे.

६ मार्चअखेर एकूण ३४०४ जणांचे एकूण ४०५८ नमुने गोळा करून त्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात वुहानमधून आलेल्या ६५४ जणांच्या १३०८ नमुन्यांचा समावेश आहे. या लोकांना आयटीबीपी छावणी, मनेसर छावणी येथे ठेवण्यात आले होते. दिवस शून्य व दिवस १४ या दोन दिवशी त्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. वुहान, डायमंड प्रिन्सेस जहाज येथून आणलेल्या भारतीयांची तपासणी दिवस शून्य रोजी करण्यात आली आहे. आता १४ दिवसांनी पुढची तपासणी केली जाणार आहे.

आरोग्यमंत्र्यांचा इशारा

आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, फेस मास्कसाठी जादा दर आकारणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढाव घेण्यासाठी त्यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. राज्यांनी विलगीकरण सुविधा निर्माण कराव्यात तसेच तपासणी प्रयोगशाळाही सज्ज असल्या पाहिजेत असे त्यांनी स्पष्ट केले.

आतापर्यंत ३४ निश्चित रुग्ण सापडले असून त्यात १६ इटालियन पर्यटकांचा समावेश आहे. २९ हजार लोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. राज्यांचे आरोग्य मंत्री, मुख्य सचिव, केंद्रीय मंत्री व विविध संघटनांचे प्रतिनिधी यांची हर्षवर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. जनतेत विषाणूबाबत जागृती निर्माण करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला आहे.

आंध्र प्रदेशात श्री व्यंकटेश्वरा इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस  (तिरूपती), आंध्र मेडिकल कॉलेज (विशाखापट्टनम), जीएमसी (अनंतपूर) येथे करोना नमुने तपासणीच्या प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. गुवाहाटीतील गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालय, दिब्रुगड येथील प्रादेशिक वैद्यक संशोधन केंद्र, बिहारमध्ये पाटण्यातील राजेंद्र प्रसाद स्मृती वैद्यकीय विज्ञान संशोधन संस्था, चंडीगडमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रीसर्च, छत्तीसगडमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्लीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, गुजरातमध्ये नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल, जामनगर येथील एम. पी. शाह सरकारी वैद्यकीय महाविद्यालय येथे तपासणी सुविधा देण्यात आल्या आहेत.