आंध्र प्रदेशच्या राजीव गांधी माहिती आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील ५४ विद्यार्थ्यांवर रँगिंग केल्याप्रकरणी व्यवस्थापनाकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात विद्यापीठात शिकणाऱ्या काही वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून कनिष्ठ विद्यार्थ्यांचे रँगिंग झाल्याचा प्रकार घडला होता. या सर्व विद्यार्थ्यांवर सोमवारी विद्यापीठ प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात आली. अशा प्रकरणातील राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

२९ ऑगस्ट रोजी विद्यापाठीतील वरिष्ठ विद्यार्थ्यांनी १२ कनिष्ठ विद्यार्थ्यांना एका खोलीमध्ये नेऊन शिक्षा दिली. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना शारीरिक इजा झाली होती. काही विद्यार्थ्यांना रूग्णालयात दाखल करण्याचीही वेळ आली होती. त्यानंतर पीडित विद्यार्थ्यांनी या सगळ्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी विद्यापीठाच्या शिस्तपालन समितीने केलेल्या चौकशीत ५४ विद्यार्थी दोषी आढळले होते. चौकशी समितीने दोषी विद्यार्थांना निलंबित करण्याची सूचना केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने सांगितले. निलंबित करण्यात आलेले विद्यार्थी विद्यापीठात सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या आणि चौथ्या वर्षात शिकत आहेत.

विद्यापीठाचे रजिस्ट्रार व्ही. व्यंकट दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोषी विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थांना वर्षभरासाठी वर्गात हजेरी लावता येणार नाही. त्याचबरोबर त्यांना वार्षिक परीक्षाही देता येणार नाही. इतर नऊ विद्यार्थांना एका वर्षासाठी महाविद्यालयातून निलंबित करण्यात आले आहे. मात्र, त्यांना वार्षिक परीक्षा देता येणार आहे. तसेच इतर १३ विद्यार्थ्यांवर नोव्हेंबरपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर उरलेल्या २४ विद्यार्थ्यांचीची विद्यापीठातून कायमची हकालपट्टी करण्यात आली आहे.

रँगिगला कंटाळून विद्यार्थ्यांकडून करण्यात येणाऱ्या आत्महत्येच्या घटना पाहता विद्यापीठाकडून या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली होती. देशात २००९ मध्ये रॅगिंगविरोधी कायदाही लागू करण्यात आला होता. त्याचबरोबर रॅगिंगसंबंधी कुठलीही तक्रार आणि मदतीसाठी सरकारने यंत्रणा उभारली होती. तरीही रँगिंगचे प्रकार थांबले नव्हते. अनेकदा पीडित विद्यार्थी घाबरून या सगळ्याच तक्रार करत नाहीत. त्यामुळे अशाप्रकारांना एकप्रकारे खतपाणी घातले जात होते.

कोअॅलिशन टू अपरुट रॅगिंग फ्रॉम एज्युकेशन (CURE) या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, २००७ ते २००१३ या कालावधीत १७१ रॅगिंगच्या ७१७ घटना घडल्या होत्या. यामध्ये ७१ विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. ३० जणांनी आत्महत्या केल्या. १९९ घटनांमध्ये विद्यार्थ्यांना गंभीर दुखापती झाल्या होत्या. १२८ घटनांमध्ये लैंगिक शोषणही झाल्याचे समोर आले आहे. ८१ विद्यार्थ्यांना मारहाणीमुळे कायमचे अपंगत्व आले होते.