संयुक्त राष्ट्रात भारताला एक मोठे राजकीय यश मिळाले आहे. आशिया-पॅसिफिक संयुक्त राष्ट्र समूहाने सर्वानुमते २०२१-२२ या दोन वर्षांसाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये म्हणजेच UNSC मध्ये भारताच्या अस्थायी सदस्यत्वासाठी पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी भारताने अशी काही राजकीय कोंडी निर्माण केली होती की, चक्क पाकिस्तानला देखील भारतच्या सदस्यत्वासाठी पाठिंबा द्यावा लागला. म्हणुन हा एकप्रकारे आंरराष्ट्रीय स्तरावरील भारताचा राजकीय विजय मानला जात आहे.

२०२१-२२ या दोन वर्षांसाठी सुरक्षा परिषदेवर ५ अस्थायी सदस्य निवड करण्याची प्रक्रिया जून २०२० ला होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीमध्ये भारताला पाठिंबा देण्याचा निर्णय आशिया-पॅसिफिक समूहाने सर्वानुमते घेतला आहे. याबाबतची माहिती भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी सैय्यद अकबरुद्दीन यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

सैय्यद अकबरुद्दीन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, एक सर्वसमावेशक पाऊल, आशिया-पॅसिफिक समूहाने सर्वानुमते भारताच्या २०२१-२२ या दोन वर्षांच्या सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यत्वासाठी उमेदवारीस पाठिंबा दिला आहे. सर्व ५५ देशांना या पाठिंब्यासाठी धन्यवाद.

त्यांनी या ट्विटबरोबरच त्यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ज्या ५५ देशांनी भारताला पाठिंबा दर्शवला आहे. त्यात अफगानिस्तान, बांग्लादेश, भूटान, चीन, इंडोनेशिया, इरान, जपान, कुवैत, किर्गिजस्तान, मलेशिया, मालदीव, म्यानमार, व्हिएतनाम, नेपाळ, श्रीलंका, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, तुर्कस्तान, सिरियासह पाकिस्तानचाही समावेश आहे. भारत आतापर्यंत सात वेळा अस्थायी सदस्य म्हणून संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेवर निवडून गेला आहे. या परिषदेचे पाच स्थायी सदस्य असून त्यामध्ये चीन, फ्रान्स, ब्रिटन, रशिया आणि अमेरिकेचा समावेश आहे.