देशात करोनाची दुसरी लाट सुरू असताना पीएम केअर्स निधीतून देशातील सरकारी रुग्णालयांत ५५१ प्राणवायू निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येतील, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. हा वैद्यकीय कारणासाठी लागणारा प्राणवायू सरकारी रुग्णालयांच्या प्रकल्पातच तयार होणार आहे. स्विंग अ‍ॅडसॉप्र्सन (अधिशोषक)  पद्धतीचे हे प्रकल्प असणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, पीएम केअर्स निधीतून सरकारी रुग्णालयांमध्ये प्राणवायू पुरवठ्यासाठी निधी देण्यात येणार आहे. हे प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावेत असे आदेश पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत. हे प्रकल्प प्राणवायू उपलब्धता वाढवणार असून जिल्हा पातळीवर त्याचा फायदा होणार आहे. हे प्राणवायू निर्मितीसाठी समर्पित असे प्रकल्प असतील तसेच राज्ये व केंद्रशासित प्रदेशात जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

पीएम केअर्स निधीतून यंदाच्या वर्षी आधीच २०१.५८ कोटी रुपये पीएसए प्राणवायू प्रकल्पांसाठी मंजूर करण्यात आले होते. त्यातील तरतूद ही १६१ प्रकल्पांसाठी होती. सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या ठिकाणी या प्राणवायू प्रकल्पांना परवानगी देण्यात आली होती.

प्रत्येक जिल्हा रुग्णालयात सुविधा

पीएसए प्राणवायू प्रकल्प सुरू करण्यामागे मुख्य उद्देश हा जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सरकारी रुग्णालयात प्राणवायू पुरवठा सुरळीत ठेवणे हा आहे. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात अशी प्राणवायू क्षमता ठेवली जाणार आहे. ही रुग्णालये स्वतङ्मच त्यांची गरज भागू शकेल एवढा प्राणवायू तयार करू शकतील. त्यामुळे रोजची प्राणवायूची गरज भागेल. द्रव वैद्यकीय प्राणवायू हा यात वेगळा राहील. त्यामुळे अचानक प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. प्रदीर्घ काळ ही यंत्रणा सुलभपणे चालू शकेल व आजारी रुग्णांना अखंडपणे प्राणवायू पुरवठा करता येणार आहे.