केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर करोना लसींचा पूर्णपणे वापर न केल्याचा आरोप केला आहे. राज्यामध्ये पाठवण्यात आलेल्या ५४ लाख करोना लसींपैकी केवळ २३ लाख लसी वापरण्यात आल्याचा दावा जावडेकरांनी केला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा करण्यासंदर्भातील मागणी केल्यानंतर जावडेकरांनी ट्विटरवरुन महाराष्ट्र सरकारवर करोना परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याची टीका केलीय. देशामध्ये करोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असून मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून करोना परिस्थितीसंदर्भात चिंता व्यक्त केलीय.

बुधवारी केंद्रीय मंत्री असणाऱ्या जावडेकरांनी महाराष्ट्र सरकारवर करोनाच्या लसींचा पूर्णपणे वापर न केल्याचा आरोप केला आहे. जावडेकरांनी ट्विटवरुन हा आरोप केला आहे. “महाराष्ट्र सरकारने राज्यात पाठवण्यात आलेल्या ५४ लाख लसींपैकी १२ मार्चपर्यंत केवळ २३ लाख लसी वापरल्या आहेत. ५६ टक्के लसी वापरण्यात आलेल्या नाहीत. आता शिवसेनेचे खासदार राज्यासाठी अधिक लसींची मागणी करत आहेत,” असं जावडेकर ट्विटमध्ये म्हणाले आहेत. शिवाय पुढे त्यांनी, “आधी महामारीवर नियंत्रण मिळवताना नियोजनाचा अभाव आणि आता लसीकरणामध्ये वाईट कामगिरी,” असा टोला महाराष्ट्र सरकारच्या काराभारावर नाराजी व्यक्त करताना लगावला आहे.

लसीवरुन राजकारण

शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेमध्ये बोलातना महाराष्ट्राला अधिक प्रमाणात लसींचे डोस देण्यात यावेत अशी मागणी केली होती. त्यानंतर जावडेकरांनी हे ट्विट केलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेऊन राज्याला २ कोटी २० लाख डोस उपलब्ध करून देण्याची मागणी केली.   दर आठवड्यात २० लाख लसींचा पुरवठा करण्याची विनंती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे. आता याच लसीकरणाच्या मुद्द्यावरुन राजकारण सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे.

या पाच राज्यात सर्वाधिक रुग्ण

मागील काही आठवड्यापासून महाराष्ट्रामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. केंद्र सरकारच्या पत्रसूचना विभागाने (पीआयबी) केलेल्या ट्विटनुसार महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये करोनाच्या अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत साडेतीन कोटींहून अधिक जणांना लस देण्यात आल्याचेही या ट्विटमध्ये म्हटलं आहे.