दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानीच्या परिसरात हवेतील प्रदुषणाच्या पातळीने धोक्याची पातळी केव्हाच ओलांडली असल्याने सुप्रीम कोर्टाने प्रदुषण रोखण्यासाठी कठोर निर्बंध घातले आहेत. त्यानुसार कडक नियमावली न पाळणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश दिल्ली पोलिसांना दिले होते. त्यानुसार, पोलिसांनी ५६२ जणांवर गुन्हे दाखल करीत हजारो किलो फटाके जप्त केले आहेत.


सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या ७२ जणांवर एक्सप्लोझिव्ह अॅक्टअंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तर ७५ लोकांवर अवैध फटाके विक्री केल्याबद्दल अटकेची कारवाई करण्यात आली आहे. पर्यावरणपुरक नसलेले (नॉन ग्रीन) आणि प्रमाणित नसलेले १७०५ किलो फटाके जप्त करण्यात आले आहेत. दिल्लीत रात्री ८ ते १० या दोन तासांच्या कालावधीतच फटाके वाजवण्याबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचे पालन न करणाऱ्या ५६२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ३२३ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहेत. दिल्लीच्या पोलीस उपाध्यक्षांनी याबाबत माहिती दिली.


दिल्ली पोलिसांनी रोहिणी भागात ८०० किलो फटाके जप्त केले. तसेच या प्रकरणी ४ जणांना अटक करुन गुन्हे नोंदवले आहेत. तर नॉर्थ वेस्ट भागात दिवाळीच्या रात्री पोलिसांनी ५७ खटले दाखल करीत १४० किलो फटाके जप्त केले. द्वारका भागातून २०० किलो फटाके जप्त करीत ४२ जणांवर गुन्हे दाखल तर साऊथ इस्ट दिल्लीत २७८ किलो फटाके जप्त करण्यात आले असून २३ खटले दाखल करुन एकूण १७ जणांना अटक करण्यात आली आहे. तर नॉर्थ दिल्लीमध्ये ७२ किलो फटाक्यांच्या जप्तीसह १४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.


दरम्यान, दिवाळीच्या काळात सुप्रीम कोर्टाने कडक निर्बंध लादले असतानाही त्याच्याकडे दुर्लक्ष करीत दिल्ली शहरातील विविध भागात रात्री उशीरापर्यंत फाटक्यांची आतषबाजी केली. त्यामुळे आज सकाळी दिल्लीच्या हवेची गुणवत्ता कमालीची खराब झाली होती. सकाळपासून आकाशात धुसर वातावरण होते. श्वास घ्यायलाही दिल्लीकरांना त्रास होत होता.