09 July 2020

News Flash

‘टिकटॉक’सह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी

केंद्र सरकारचा निर्णय, राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असल्याचा ठपका

संग्रहित छायाचित्र

 

लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली.

वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे  बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केले. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने बंदीचे आदेश जारी करताना म्हटले आहे. हे हानीकारक अ‍ॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती. तसेच नागरिकांतूनही या अ‍ॅपबाबत तक्रारी येत होत्या, असेही मंत्रालयाने या आदेशांत म्हटले आहे.

केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींचा आधार घेत ही कारवाई केली. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ‘६९अ’ मधील तरतुदींचा आधार घेत ५९ अ‍ॅपवर बंदी आणण्यात आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालींवर प्रचलित असलेल्या या अ‍ॅपकडून भारतीय वापरकर्त्यांची माहिती बेकायदा साठवून भारताबाहेरील सव्‍‌र्हरना पुरवली जात असल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून करण्यात आल्या होत्या.

भारत आणि चीन सैन्यात गलवान खोऱ्यात संघर्ष होण्याच्या आधीपासून म्हणजे देशात करोनाचा फैलाव वाढू लागल्यापासूनच चिनी वस्तूंप्रमाणे चिनी मोबाइल आणि अ‍ॅपवरही बहिष्कार घालण्यासंदर्भात समाजमाध्यमांवरून मोहीम चालवली जात होती. ही अ‍ॅप वापरकर्त्यांच्या माहितीचा गैरवापर करीत असल्याच्या तक्रारीही सातत्याने येत होत्या. विशेषत: टिकटॉक या लोकप्रिय अ‍ॅपवरून प्रसारीत केल्या जाणाऱ्या चित्रफिती आणि संवाद यांच्याविषयी अनेकदा वादंग निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी या अ‍ॅपवर घातलेल्या बंदीचे स्वागत होत आहे.

बंदीबाबत सरकार काय म्हणते?

* राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक माहितीच्या गैरवापरातून एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहेत.

* अ‍ॅपवर बंदी घातल्यामुळे मोबाइल आणि इंटरनेट वापरणाऱ्या कोटय़वधी भारतीयांच्या हिताचे रक्षण होईल.

* देशाची सायबर सुरक्षितता आणि सार्वभौमत्वाच्या हमीसाठी हा ‘लक्ष्यवेधी’ निर्णय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 12:42 am

Web Title: 59 chinese apps banned including tiktok abn 97
Next Stories
1 केंद्राकडून निर्बंध शिथिल
2 पेट्रोल-डिझेलची पुन्हा दरवाढ 
3 देशातील रुग्णसंख्या साडेपाच लाखांजवळ
Just Now!
X