प्रकृती चिंताजनक; पण स्थिर
सियाचेनमध्ये हिमकडा कोसळून त्याखाली गाडल्या गेलेल्या लष्कराच्या १० जवानांपैकी लान्स नाइक हनुमंतप्पा सहा दिवसांनी जिवंत आढळले असून, त्यांना तातडीने दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, उर्वरित आठ जवानांचे मृतदेह मदतकार्य पथकाच्या हाती लागले आहेत.
हनुमंतप्पा यांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर असून, रुग्णालयात त्यांच्या विविध प्रकारच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. हनुमंतप्पा हे कर्नाटकमधील असून ते २५ फूट बर्फाखाली जवळपास पाच दिवस गाडले गेले होते. सोमवारी त्यांना जिवंत बाहेर काढण्यात मदतकार्य पथकाला यश आले. लष्कराच्या तळावरील एका कनिष्ठ अधिकाऱ्यासह अन्य नऊ जण या दुर्घटनेत मरण पावले आहेत.
दरम्यान, अन्य आठ जवानांचे मृतदेह मंगळवारी मदतकार्य पथकाने बाहेर काढले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मदतकार्य पथकाने अविश्रांत मेहनत घेऊन जवानांचे मृतदेह बाहेर काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन हनुमंतप्पा यांच्या प्रकृतीची चौकशी केली. हनुमंतप्पा यांच्या धैर्याचे या वेळी मोदी यांनी कौतुक केले. हनुमंतप्पा यांच्या प्रकृतीला लवकर आराम मिळो, अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली आहे.