दिल्लीत स्वयंपाकाच्या गॅसचा स्फोट होऊन वेगवेगळ्या घटनात दोन मुले व दोन महिला यांच्यासह सहा ठार झाले असून इतर ३४ जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पूर्व दिल्लीत गांधीनगर भागात सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. ज्या घरात सिलिंडरचा स्फोट झाला त्याच्या व समोरच्या घराच्या भिंती कोसळल्या आहेत, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. मृतांची नावे राजेश गोयल, पूनम व सोनीराम अशी आहेत. जखमींची नावे नयना (वय ४), गिरीश (वय ६), क्रिश (वय १२), नौशाद (वय ८) सोनू कश्यप (वय ६०) अशी आहेत. इतर जखमींची ओळख पटलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. जखमींना एलएनजेपी रुग्णालयात दाखल केले आहे. दुसऱ्या एका घटनेत आग्नेय दिल्लीतील आश्रम चौक भागात तीस वर्षे वयाची ममता नावाची महिला व कृतिका (वय ९), प्रियांका (वय ११) या मुली असे तीन जण आगीत जळून मरण पावले. या आगीत २३ जण जखमी झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. सोमवारी रात्री साडेआठ वाजता पहिल्या मजल्यावर सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागली. ममता व त्यांच्या दोन मुली तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये अडकून पडल्या व बाहेर येऊ शकल्या नाहीत. काही लोकांनी त्यांच्या बाल्कनीतून उडय़ा मारल्याने ते वाचले. एक महिला व मुलासह तीन जण जखमी झाले.