गोव्याच्या काणकोण किनाऱ्यापासून ४७ सागरी मैल अंतरावर खोल समुद्रात गुरुवारी पहाटे नौदलाची एक बोट मासेमारी करणाऱ्या ‘अ‍ॅना मारिया’ या ट्रॉलरवर आदळून झालेल्या भीषण अपघातात ट्रॉलरवरील २३ जण समुद्रात बुडाले. त्यातील १७ जणांना स्वतचा जीव वाचविता आला असला तरी सहाजण बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी तटरक्षक आणि नौदलाने तातडीने मोहीम हाती घेतली आहे.
ही धडक इतकी जोरदार होती की ट्रॉलरचे दोन तुकडे झाले त्यामुळे मदतीसाठी संपर्क साधणेही ट्रॉलरवरील लोकांना जमले नाही, असे बचावलेल्या एका मच्छिमाराने सांगितले.
दक्षिण गोव्याच्या कटबोना मासेमारी धक्क्य़ावरून बुधवारी रात्री हा ट्रॉलर मासेमारीसाठी समुद्रात उतरला होता. ट्रॉलरवर प्रखर दिवे होते त्यामुळे अन्य कोणत्याही जहाजाला ट्रॉलर दिसणे अशक्य नव्हतेच, असा दावा या ट्रॉलरवरील कृष्णा शिवपुंडी या कर्मचाऱ्याने केला. ट्रॉलर बुडताच सर्व मच्छिमार जीवरक्षक जॅकेट घालून स्वतच्या बचावासाठी पाच तास खोल समुद्रात धडपडत होते. तटरक्षक दलाच्या मदतबोटींनी उशिराने का होईना, पण धाव घेतल्यानंतर त्यांचे प्राण वाचले.