झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील छिंजो परिसरात मंगळवारी रात्री नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरूंग स्फोटात ६ जवान शहीद झाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात काही नक्षलवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी इतर सुरक्षा दलाच्या मदतीने येथे शोध मोहीम सुरू केली होती. याचदरम्यान नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरूंगाचा स्फोट झाला आणि यात ६ जवान शहीद तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला होता. त्यामुळे बिथरलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याचवेळी रस्त्यामध्ये पेरलेल्या भूसुरूंगाचा स्फोट झाला. यात ६ जवान शहीद झाले. या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले आहेत. उपचारासाठी सर्व जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती गढवाचे पोलीस उपमहानिरीक्षक विपुल शुक्ला यांनी दिली. माध्यमांत आलेल्या माहितीनुसार सुमारे १० जवान जखमी आहेत. हल्ल्यानंतर परिसरात अतिरिक्त सुरक्षा दलांना तैनात करण्यात आले आहे.

 

दरम्यान, मंगळवारी झालेल्या या हल्ल्यापूर्वी मार्चमध्ये छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातही नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात सुरक्षादलाचे ९ जवान शहीद झाले होते. तेव्हा हल्ल्यात ६ जवान जखमी झाले होते. सुकमा हल्ल्यावेळी नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला आणि नंतर गोळीबार केला होता. सुकमा हल्ल्यात १०० नक्षलवादी सहभागी झाले होते, असे सांगण्यात येते.