11 August 2020

News Flash

कानपूर चकमकीतील २१ आरोपींपैकी ६ ठार !

विकास दुबेचे राजकीय संबंध चव्हाटय़ावर

संग्रहित छायाचित्र

 

कानपूर जिल्ह्य़ातील बिकरू खेडय़ात ८ पोलीस ठार झालेल्या ३ जुलैच्या घटनेच्या संबंधात जो एफआयआर नोंदवण्यात आला, त्यात नमूद करण्यात आलेल्या २१ जणांपैकी ६ जणांना पोलिसांनी ठार मारले असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.

बिकरू येथे पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याच्या दिवशी, विकास दुबेचे साथीदार प्रेमप्रकाश पांडे व अतुल दुबे हे कानपूर जिल्ह्य़ात पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारले गेले. ८ जुलैला पोलिसांनी विकासचा साथीदार अमर दुबे याला हमीरपूर जिल्ह्य़ातील मौदहा खेडय़ात ठार मारले.

गुरुवारी आणखी २ साथीदार कानपूर व इटावा जिल्ह्य़ांत मरण पावले. त्यापैकी प्रभातचा मृत्यू विकास ज्या परिस्थितीत मरण पावला, त्याचप्रकारे झाला. फरीदाबाद येथे अटक करण्यात आल्यानंतर ट्रांझिट रिमांडवर कानपूरला नेण्यात येत असताना त्याने एका पोलिसाचे पिस्तूल हिसकून पळून जाण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी म्हटले होते.

पत्नी, मुलाला अटक

विकास दुबे याला मध्य प्रदेशातील उज्जन येथे अटक करण्यात आल्यानंतर काही तासांतच, उत्तर प्रदेश विशेष कृती दलाने (एसटीएफ)गुरुवारी सायंकाळी त्याची पत्नी, मुलगा व एक नोकर यांना अटक केली.

विकासची पत्नी रिचा दुबे हिला या गुंडाला आश्रय दिल्याच्या आणि त्याच्याशी संगनमत केल्याच्या आरोपांखाली तिच्या कृष्णनगर येथील घरून अटक करण्यात आली. विकासचा मुलगा व एक नोकर यांनाही अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. कानपूर येथे पोलीस पथकाची  हत्या करण्यात आली, त्याला कारणीभूत ठरलेल्या घटनाक्रमाशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी तिची चौकशी करण्यात येत आहे, असे पोलिसांच्या एका प्रवक्त्याने सांगितले.

हैदराबाद आणि वारंगलमधील चकमकींवर प्रश्नचिन्ह 

गेल्या  नोव्हेंबर महिन्यात हैदराबाद  शहरात २८ वर्षीय एका पशुवैद्यक महिलेची बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली. घटनेची चौकशी करण्यासाठी म्हणून या चारही आरोपींना पहाटेच्या वेळी घटनास्थळी नेण्यात आले. तेव्हा पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करताना   प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चारही आरोपी ठार झाले. हैदराबाद – बंगळुरू महामार्गावर मध्यरात्रीच्या वेळी चौकशीसाठी का नेण्यात आले, याचे उत्तर तेलंगणा सरकार किं वा पोलीस देऊ शकले नाहीत. २००८ मध्ये आंध्र प्रदेशातील वारंगलमध्ये दोन महाविद्यालयीन युवतींवर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात तीन युवकांना अटक करण्यात आली होती. तेव्हाही नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रि या उमटली होती. अ‍ॅसिडचा साठा जप्त करण्याकरिता म्हणून तिन्ही आरोपींनी मध्यरात्री शहराबाहेरील मोकळ्या जागेत नेण्यात आले आणि तेथे झालेल्या चकमकीत तिन्ही आरोपी ठार झाले  होते.

विकास दुबेचे राजकीय संबंध चव्हाटय़ावर

उत्तर प्रदेश एसटीएफने शुक्रवारी एनकाऊंटरमध्ये ठार मारलेल्या गँगस्टर विकास दुबे याचा गुन्हेगारीचा मोठा इतिहास आहे. सुमारे ६० गुन्ह्य़ांमध्ये सहभाग असलेल्या दुबेची समाजात प्रचंड दहशत होती. रिअल इस्टेटच्या क्षेत्रात दादागिरी करणाऱ्या दुबेने एक जिल्हास्तरीय निवडणूक जिंकली होती आणि अनेक राजकीय नेत्यांसोबत त्याचे संबंध होते.

समाजमाध्यमावरील एका जुन्या छायाचित्रात दुबे हा एका कार्यक्रमात उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्यांशेजारी बसलेला दिसतो. हा मंत्री पक्ष बदलून भाजपमध्ये गेला होता. यातून दुबेचे राजकीय कृपाछत्र दिसून येते, असा दावा काँग्रेसने केला.

दुसऱ्या एका पोस्टरमध्ये दुबे त्याची पत्नी रिचा दुबे हिच्यासाठी जिल्हा पंचायत निवडणुकीत मते मागताना दिसतो. रिचा या निवडणुकीत जिंकली होती. आता विरोधी पक्षात असलेल्या दोन नेत्यांची छायाचित्रेही या पोस्टरमध्ये आहेत. रिचाला त्यांचा पाठिंबा होता, असे त्यातून दिसते.

२००० साली विकास दुबे जिल्हा पंचायत निवडणुकीत शिवराजपूर जागेवर निवडून आला होता. एका खुनाच्या गुन्ह्य़ात तुरुंगात असताना तेथूनच त्याने ही निवडणूक लढवली होती. तथापि, ‘विकास सध्या भाजपमध्ये नाही, तो समाजवादी पक्षात आहे’, असे गुरुवारी त्याची आई सरला देवी यांनी सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 12:07 am

Web Title: 6 out of 21 accused killed in kanpur encounter abn 97
Next Stories
1 संसदीय स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत करोनावर खल
2 “सुशांतच्या आत्महत्येबाबत शाहरुख, सलमान आणि आमिर गप्प का?”
3 महाराष्ट्रात ७ हजार ८६२ नवे करोना रुग्ण, चोवीस तासात २२६ मृत्यू
Just Now!
X