करोना व्हायरसची लागण झालेल्या सहकाऱ्यासोबत सेल्फी काढल्यामुळे पाकिस्तानात सहा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पाकिस्तानात आतापर्यंत ७५० जणांना करोना व्हायरसची लागण झाली असून, चौघांचा मृत्यू झाला आहे.

करोना व्हायरसचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या सहकाऱ्यासोबत सेल्फी काढल्यामुळे खैरपूर जिल्ह्याच्या उपायुक्तांनी सहा महसूल अधिकाऱ्यांना निलंबित केले. इंडियन एक्स्प्रेसने डॉन न्यूजच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. करोना व्हायरसची लागण झालेला हा रुग्ण नुकताच इराणहून परतला होता.

यात्रेसाठी तो इराणला गेला होता. महसूल विभागाचे हे अधिकारी सहकाऱ्याची सदिच्छा भेट घेण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. “ज्यावेळी हे अधिकारी सहकाऱ्याला भेटायला गेलेले त्यावेळी करोनाची कुठलीही लक्षण त्याच्यामध्ये आढळली नव्हती तसेच त्याने तक्रारही केली नव्हती. त्यावेळी त्यांनी सेल्फी काढला व सोशल मीडियावर पोस्ट केला होता. काही दिवसांपूर्वी त्याचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांना शोधून त्यांचे विलगीकरण करण्यात आले” असे वृत्तात म्हटले आहे.

पाकिस्तानात लॉकडाउन करु शकत नाही – इम्रान खान
करोना व्हायरस जगभरात थैमान घालत असताना अनेक देशांनी लढा देण्यासाठी लॉकडाउन जाहीर केलं आहे. पाकिस्तानाही करोनाने शिरकाव केला असून लॉकडाउन केलं जावं अशी मागणी होत आहे. मात्र पंतप्रधान इम्रान खान यांनी हे शक्य नसल्याचं सांगितलं आहे. देशातील एक तृतीयांश जनता दारिद्र्य रेषेखाली जगत असून रोजंदारीवर आपलं पोट भरत असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

“पूर्ण लॉकडाउन करणं म्हणजे कर्फ्यू लागू करणे. लोकांना जबरदस्ती घऱाच्या आत राहण्यास भाग पाडणे. आमच्या देशातील २५ टक्के जनता ही दारिद्र्य रेषेखाली जगत असून रोजंदारीच्या कमाईवर आपलं पोट भरते. आम्ही आमची स्थिती लक्षात घेता योग्य ती पाऊलं उचलत आहोत,” असं इम्रान खान यांनी सांगितलं आहे.