28 May 2020

News Flash

भारताच्या कारवाईत ६ पाकिस्तानी सैनिक ठार

अनेक दहशतवादी ठार; तळ, चौक्या उद्ध्वस्त 

(संग्रहित छायाचित्र)

पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने रविवारी पाकव्याप्त काश्मीरमधील नीलम खोऱ्यात तोफांचा मारा करून तेथील दहशतवादी तळ आणि पाकिस्तानी लष्करी चौक्या उद्ध्वस्त केल्या. या कारवाईत ६ ते १० पाकिस्तानी सैनिक ठार झाले, तर काही दहशतवादीही मारले गेले.

भारतीय लष्कराच्या कारवाईत ६ ते १० पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचे आणि जवळजवळ तेवढेच दहशतवादी मारले गेल्याचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनीही  प्रसारमाध्यमांना सांगितले. या कारवाईत तीन दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या कारवाईत किमान २० दहशतवादी ठार झाल्याची माहिती विश्वासार्ह सूत्रांनी दिली.

दहशतवाद्यांना भारतीय भूमीत घुसखोरीची संधी मिळावी या हेतूने पाकिस्तानी लष्कराने युद्धबंदीचा भंग करून शनिवारी संध्याकाळी तंगधर क्षेत्रात गोळीबार केल्याचे लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद, एक नागरिक ठार, तर तीन जवान जखमी झाल्याने भारताने प्रत्युत्तरादाखल रविवारी नीलम खोऱ्यातील दहशतवादी तळ आणि पाकिस्तानी चौक्यांवर तोफगोळे डागले.

भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांचे तळ आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या. त्याचबरोबर या कारवाईत दहशतवादी आणि पाकिस्तानी लष्कराचीही मोठी हानी झाली, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. पाकिस्तानी लष्कराने दहशतवादी कारवायांना मदत करणे सुरूच ठेवले तर भारतीय लष्कर प्रत्युत्तर देईल. त्यासाठी वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील किमान चार दहशतवादी तळांना लक्ष्य केल्याच्या वृत्ताचा पाकिस्तानने मात्र इन्कार केला. भारताच्या दाव्यातील फोलपणा उघड करण्यासाठी आम्ही कारवाईचे कथित ठिकाण संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील कायम सदस्य देशांच्या (पी ५) राजनैतिक अधिकाऱ्यांना दाखवू शकतो, असे पाकिस्तानचे परराष्ट्र प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी स्पष्ट केले.

भारतीय लष्कराच्या या कारवाईची तुलना पाकव्याप्त काश्मीरमध्ये सप्टेंबर २०१६मध्ये केलेल्या दहशतवादी तळांवरील लक्ष्यभेद हल्ल्याशी करता येणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, भारतीय लष्कराच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या गोळीबारात भारताचे किमान नऊ सैनिक ठार झाल्याचा आणि अनेक जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला. भारताने मात्र हा दावा फेटाळला आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी, पाकिस्तानने पाच नागरिक गमावल्याची माहिती देणारे ट्वीट केले आहे. पाकिस्तानने भारतीय राजदूत गौरव अहलुवालिया यांच्याकडे भारतीय लष्कराच्या गोळीबारात नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल निषेध नोंदवला आहे.

पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादच्या पोलीस उपायुक्तांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार मुजफ्फराबाद जिल्ह्य़ातील नौशेरी क्षेत्र आणि आसपासच्या नीलम खोऱ्यातील जुरा क्षेत्रात मोठी हानी झाली आहे.

..तर चोख प्रत्युत्तर – बिपिन रावत

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे ६-१० सैनिक मारले गेल्याचे आणि तीन दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाल्याची माहिती लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिली. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार ६ ते १० पाकिस्तानी सैनिक आणि जवळजवळ तेवढेच दहशतवादी ठार झाले आहेत. परंतु नेमके किती दहशतवादी ठार झाले याची सविस्तर माहिती आम्ही मिळवत आहोत, असेही रावत यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यापासून सीमेपलीकडून दहशतवाद्यांच्या घुसखोरीबाबतची माहिती वारंवार मिळत आहे, अशी पुष्टीही रावत यांनी जोडली. पाकिस्तानने अशा कारवाया सुरू ठेवल्या, तर प्रत्युत्तर देण्यास भारत कचरणार नाही, असा इशाराही रावत यांनी दिला.

घडले काय?

* नियंत्रण रेषेजवळील तंगधर क्षेत्रात शनिवारी संध्याकाळी पाकिस्तानी लष्कराचा गोळीबार

* या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद, तर एका नागरिकाचा मृत्यू

* भारतीय भूमीत दहशवाद्यांना घुसखोरीची संधी मिळावी म्हणून पाकिस्तानचा गोळीबार

* भारतीय लष्कराचे चोख प्रत्युत्तर, दहशवादी तळ, पाकिस्तानी चौक्यांवर तोफगोळ्यांचा मारा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2019 12:40 am

Web Title: 6 pakistani soldier killed in indian operation abn 97
Next Stories
1 कर्तारपूर मार्गिकेचे ९ नोव्हेंबरला उद्घाटन
2 मनमोहन सिंग उद्घाटनास जाणार नाहीत
3 रेल्वे मंडळाचा आकार २५ टक्क्यांनी कमी करणार
Just Now!
X