लहान मुले पळविणारी टोळी असल्याच्या संशयावरून कृत्य

लहान मुले पळविणारी टोळी असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी सहा जणांना बेदम मारहाण करून ठार मारल्याची घटना सेराईकेला-खारस्वान जिल्ह्य़ातील राजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ठार मारण्यात आलेल्या सहाजणांमध्ये दोघा भावांचा समावेश असून ते स्वच्छ भारत अभियानात काम करीत होते.

दोन ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये एकूण सहा जण ठार झाले. पहिल्या घटनेत ठार झालेल्यांची नावे शेख सज्जू (२५), शेख सिराज (२६) आणि नईम (३५) अशी आहेत. एक जण बेपत्ता झाला असून त्याचे नांव शेख हलीम (२८) असे आहे.

दुसरी घटना गुरुवारी दुपारी घडली त्यामध्ये गौतम वर्मा (२७) आणि त्याचा भाऊ विकास वर्मा (२५) हे बेदम मारहाणीत ठार झाले. त्यांचा मित्र गणेश गुप्ताही ठार झाला तर उत्तम वर्मा हा जखमी झाला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गतच्या बैठकीला हजर राहून परतत असताना बेदम मारहाण करण्यात आली. दोन्ही हल्ले आदिवासी जमातीकडून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या वेळी संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी पोलिसांच्या दोन वाहनांनाही आग लावली. लहान मुले पळविणाऱ्या टोळीतील असल्याचे समजून गावकऱ्यांनी नागदिह येथे तिघांना बेदम मारहाण करून ठार मारले. या धुमश्चक्रीत एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पोलीस अधीक्षक (शहर) प्रशांत आनंद यांनी सांगितले.

पोलीस घटनास्थळी पोहोचताच गावकऱ्यांनी त्यांच्यावरही दगडफेक केली आणि त्यांच्या वाहनांना आग लावली. यामध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यापूर्वी सोसोमोली गावात दोघांना, तर शोभापूर गावात एकाला गावकऱ्यांनी बेदम मारहाण करून ठार मारल्याची घटना घडली.