गाझियाबाद येथे शनिवारी एका सहा वर्षाच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने निर्दयीपणे केलेल्या मारहाणीनंतर रुग्णालयात दाखल करावे लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. शाळेत दिलेला गृहपाठ न केल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या शिक्षिकेने अक्षय कश्यप या विद्यार्थ्याला मारहाण केली. लाकडी आणि लोखंडी पट्टीच्या सहाय्याने मारहाण केल्यामुळे अक्षयच्या संपूर्ण अंगाला सूज आली आहे. मारताना किंचाळू नये यासाठी शिक्षिकेने त्याच्या तोंडात रूमाल कोंबल्याचेही अक्षयच्या पालकांनी सांगितले. त्यानंतर या शिक्षिकेने अक्षयला उपाशी राहण्याची शिक्षासु्दधा दिली. याप्रकरणी भारतीय दंडसंहितेच्या कलम ३२३ नुसार शाळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित शिक्षिकेला शाळेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती शाळेच्या प्राचार्यांनी दिली आहे.