सोशल मिडियावर सध्या एक हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक सहा वर्षांचा मुलगा आजोबांना एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये नेताना स्ट्रेचर ढकलताना दिसत आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील देओरिया जिल्ह्यातील शासकीय जिल्हा रुग्णालयातील असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या रुग्णालयातील वॉर्ड बॉयवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक रुग्णाला घेऊन जाण्यासाठी वॉर्ड बॉय ३० रुपयांची मागणी करत असल्याचा आरोप रुग्णांनी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

मुलगा स्ट्रेचर ढकलत असल्याचा आठ सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वॉर्ड बॉयवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्या आहे. स्ट्रेचरवर या मुलाचे आजोबा असून हे स्ट्रेचर पुढून त्यांची मुलगी खेचत आहे. स्ट्रेचरला मागून धक्का देत हा मुलगा आईला मदत करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या व्हायरल व्हिडिओची दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातील माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांनीच दिली आहे.

या वयस्कर रुग्णाची मुलगी बिंदू हीने पत्रकारांना घडलेल्या घटनेसंदर्भात सांगताना, वॉर्ड बॉय माझ्या वडीलांना एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये घेऊन जाण्यासाठी आणि ड्रेसिंग करण्यासाठी दर फेरीला ३० रुपये मागत होता असं म्हटलं आहे.

रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बरहाज येथील गौरा गावातील छेदी यादव या व्यक्तीला दोन दिवसापूर्वी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. छेदी यांच्या कुटुंबियांनी त्यांना सर्जिकल वॉर्डमध्ये दाखल केलं होतं. छेदी यांची देखभाल करण्यासाठी त्यांची मुलगी बिंदू आणि तिचा मुलगा त्यांच्यासोबत होते. “स्ट्रेचरवरुन रुग्णाला एकीकडून दुसरीकडे नेण्यासाठी दर  फेरीमागे रुग्णालयातील कर्मचारी ३० रुपयांची मागणी करत होते. मी जेव्हा पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्याने स्ट्रेचर घेऊन जाण्यास नकार दिला,” असं बिंदूने पत्रकारांना सांगितलं.

देओरियाचे जिल्हाधिकारी अमित किशोर यांनी सोमवारी रुग्णालयामध्ये जाऊन या प्रकरणाची चौकशी  केली. त्यांनी छेदी यादव यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली. तसेच त्यांनी घडलेल्या प्रकारासंदर्भात चौकशीसाठी एक समिती नेमली असून लवकरात लवकर या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. “छेदी यादव यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यांची पत्नी पार्वती यांनाही खूप अशक्तपणा असून त्यांनाही चक्कर आल्याची माहिती मला देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीचा व्हायरल व्हिडिओ पाहता प्राथमिक अंदाजानुसार वॉर्ड बॉय दोषी असल्याचे दिसत आहे. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वॉर्ड बॉयला निलंबित केलं आहे,” अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिली.