उत्तर बंगालमध्ये मेंदूज्वराने (जपानी इन्सॅफालिटिस) दगावलेल्यांचा आकडा आता ६० वर गेला आहे. येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे सात जिल्ह्य़ांतील परिस्थिती गंभीर बनली असून यावर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश सरकारने प्रशासनाला दिले आहेत.
पश्चिम बंगाल आरोग्य सेवा संचालक विश्वरंजन सत्पती यांनी सोमवारी ही माहिती दिली. सोमवारी दिवसभर सत्पती यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्य़ातील सर्व आरोग्य अधिकाऱ्यांची एक बैठक झाली. ६० जणांना मेंदूज्वर झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ७ जुलै ते २० जुलै या १३ दिवसांच्या कालावधीत ६० जणांचा मृत्यू झाला असून ३४४ जण या तापाची लागण झाली आहे. मृत्युमुखींचा आकडा पाहता परिस्थिती धोक्याची आहे. त्यामुळे प्रशासनाला खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले. सध्या रुग्णालयात मेंदूज्वराची चाचणी घेणारी यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे पर्यायी यंत्रणेचा सुरू आहे. जलपायगुडी जिल्ह्य़ाला मेंदूज्वराचा सर्वात मोठा फटका बसला आहे. याशिवाय धुपगुरी आणि मोयानगुरी येथील ग्रामीण भागांतील मृत्युमुखींचा आकडा मोठा आहे.
पश्चिम बंगालमधील मृतांना लागण झालेल्या मेंदूज्वराचे मूळ हे जपानमधील आहे आणि हे प्रमाण २०१३ मध्ये झालेल्या मृतांपेक्षा अधिक आहे. त्या वेळी मेंदूज्वराने केवळ पाच जण दगावले होते. गेल्या वेळी मेंदूज्वराने ३८५ जणांना या तापाची लागण झाली होती.