बंगळुरू येथून इसिसचे ट्विटर खाते हाताळणाऱ्या मेहदी मसरूर बिश्वास याचे ६० टक्क्यांहून अधिक समर्थक बिगर मुस्लीम असून बहुसंख्य मुस्लीम समर्थक हे पाश्चिमात्य देशांतील मुख्यत्वे ब्रिटनमधील आहेत, अशी माहिती गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी लोकसभेत दिली.
मेहदी याला १३ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. इसिसच्या समर्थनार्थ मजकूर आपल्या ट्विटर आणि समाज माध्यम खात्यामार्फत देणे इतकेच आपले काम होते, आपण इसिससाठी कोणत्याही व्यक्तीची भरती केलेली नाही, असे मेहदी याने चौकशीदरम्यान सांगितल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.
सीरिया, इराक आणि अफगाणिस्तानातील घडामोडींवर मेहदीचे माहितीच्या महाजालाच्या माध्यमातून महाविद्यालयीन दिवसांपासून बारकाईने लक्ष होते आणि सोशल नेटवर्किंगमध्ये त्याचा २००९ पासून सक्रिय सहभाग होता. दरम्यानच्या काळात मेहदीने समाज माध्यमांमार्फत जनतेशी संवाद साधला. मात्र इसिससाठी कोणाचीही भरती केल्याच्या वृत्ताचा त्याने इन्कार केला, असे गृहमंत्री म्हणाले.
ट्विटर खात्याच्या माध्यमातून इसिसबाबतची माहिती वितरित केल्याने मेहदी ब्रिटनमधील इलेक्ट्रॉनिक माध्यमांत प्रसिद्ध झाला, असेही ते म्हणाले.