स्वयंघोषित संत दाती महाराजाच्या आश्रमातून ६०० मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दाती महाराजांविरोधात बलात्काराचा आरोप झाल्यानंतर ही बातमी समोर आली आहे. राजस्थान येथे असलेल्या आश्रमातून या मुली बेपत्ता झाल्याची माहिती मिळते आहे. दिल्ली पोलिसांचे एक पथक दाती महाराजांवर झालेल्या आरोपानंतर राजस्थान या ठिकाणी असलेल्या आश्रमात गेले होते. तिथे या पथकासोबत पीडित मुलगीही होती. त्या आश्रमात दाती महाराज नव्हते.

स्वयंघोषित संत दाती महाराजवर त्यांच्या एका शिष्येने बलात्काराचा आरोप केला असून या प्रकरणी पोलिसांनी दाती महाराजविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे गुन्हा दाखल होताच ‘फरार’ झालेल्या दाती महाराजांनी माध्यमांना एक व्हिडिओ पाठवून त्यांची बाजू मांडली. मी त्या मुलीवर कोणताही आरोप करणार नाही. मी तपासात सहकार्य करण्यास तयार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

दक्षिण दिल्लीतील फतेहपूर बेरीमधील शनिधाम मंदिरालगत दाती महाराजाचा आश्रम आहे. पीडित तरुणी २५ वर्षांची असून ती गेल्या १० वर्षांपासूव दाती महाराज यांची अनुयायी होती. ‘दाती महाराजने माझ्यावर आश्रमात बलात्कार केला. या घटनेची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी मला देण्यात आली. हे अत्याचार असह्य झाल्याने मी शेवटी पोलिसांकडे गेले’, असे पीडित तरुणीने म्हटले आहे.

‘दोन वर्षांपूर्वी माझ्यावर बलात्कार करण्यात आला होता. आश्रमातील महिला अनुयायी मला बळजबरीने दाती महाराजच्या खोलीत न्यायच्या. अत्याचाराला कंटाळून मी त्यावेळीच आश्रमातून पळ काढला. घरी जाऊन आई- वडिलांना हा प्रकार सांगितला. पण दाती महाराज यांचे बड्या नेत्यांशी संबंध असल्याने मी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास घाबरत होते. शेवटी मी धाडस दाखवले आणि तक्रार दाखल केली, असे तिने स्पष्ट केले. आता याच दाती महाराजाच्या आश्रमातून ६०० मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर येते आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.