जगभरातील सुमारे ६०० हून अधिक शैक्षणिक संस्था आणि विचारवंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले पत्र लिहून कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणी आपली नाराजी दर्शवली आहे. देशात इतकी गंभीर स्थिती असतानाही मोदींनी मौन बाळगल्याचा आरोप या पत्रातून त्यांनी केला आहे.

कठुआ आणि सूरत येथील अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि हत्या व उन्नाव येथील मुलीवर बलात्कार झाल्यानंतर देशभरातून आंदोलन करण्यात येत आहे. त्याचवेळी या विचारवंतांनी हे पत्र पंतप्रधानांना लिहिले आहे. याचदरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळानेही १२ वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलींवर बलात्कार प्रकरणी दोषी आढळल्यास मृत्युदंडासह अनेक कठोर शिक्षांची तरतूद असलेल्या अध्यादेशास मंजुरी देण्यात आली आहे.

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कठुआ-उन्नाव आणि त्यानंतरच्या घटनांबाबत आम्हाला आमचा क्लेश आणि दु:ख व्यक्त करायचे आहे. आम्ही पाहिले आहे की, आपल्या पक्षाच्या प्रवक्त्याने या घटनांवरून लक्ष वळवण्याचा, वेग‌वेगळ्या पद्धतीने मांडणी करण्याचा प्रयत्न केला. देशातील या भयानक स्थितीवर तुम्ही दीर्घकाळ मौन पाळून असल्याचे आणि या घटनांशी आपल्या पक्षाचे असलेले संबंध, जे नाकारता येणार नाहीत, आम्ही पाहात आहोत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या पत्रावर न्यूयॉर्क विद्यापीठ, ब्राऊन विद्यापीठ, हार्वर्ड, कोलंबिया विद्यापीठ आणि विविध आयआयटी आदी शिक्षणसंस्था आणि विचारवंतांच्या स्वाक्षरी आहेत.